वादळी पावसामुळे मुंबई-मोरा बोटसेवा बंद; मारबे धरण परिसरातही हजेरी

उकाडय़ामुळे पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या नवी मुंबईकरांना सलग दुसऱ्या दिवशीही हजेरी लावल्यामुळे दिलासा मिळाला. दोन दिवसात १७.६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरातील दहा झाडे पडली असून महापालिकेने वृक्ष छाटणीकडे दुर्लक्ष केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.  तर काही ठिकाणी वीज समस्या निर्माण झाली होती.

सोमवारी सायंकाळी ९ नंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली होती. तर मंगळवारी दुपारनंतर नवी मुंबईत सर्वदूर पाऊस झाला. मोरबे धरण परिसरातही पाऊस झाला. पावसामुळे विविध मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू असली तरी कोठेही अडथळा निर्माण झाला नसल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.

सोमवारी सरासरी ८ मि.मी. पाऊस झाला. मोरबे धरण परिसरातही ४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे तीन ठिकाणी झाडे पडली.  मंगळवारी बेलापूर विभागात १०, नेरुळ १४.५, वाशी ५ तर ऐरोली विभागात ८.८ मिलीमीटर असा सरासरी ९.६२ मिलीमीटर पाऊस झाला.

उरण तालुक्यातील बहुतेक भागांतील वीज गायब झाली होती. करंजा, उरण तसेच उरणच्या पश्चिम विभागातील नागरिकांना अंधारात राहावे लागले.  रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. शहरात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांची धावपळ झाली.

पनवेल शहरासह कळंबोली, खांदेश्वर परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता. सोमवारी रात्री पावसामुळे शहरातील मिडलक्लास सोसायटी परिसरात वीजवाहिनीवर झाड पडल्यामुळे पनवेल शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. काही तासांच्या मशागतीनंतर फांद्या काढल्यावर वीजपुरवठा पूर्ववत झाला. महावितरण कंपनीने खबरदारी म्हणून मंगळवारी वीज यंत्रणेची दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने शहर परिसरात वीज नव्हती. वर्षांतील प्रत्येक आठवडय़ातील एक दिवस विजेची दुरुस्ती या कामासाठी महावितरण दिवसभर वीजपुरवठा खंडित करते, तरीही पाऊस झाला की वीज गुल होते, त्यामुळे नेमकी वर्षभरातील आठवडय़ातील ते शटडाऊन कोणासाठी, असा प्रश्न वीजग्राहकांना पडला आहे.

धोक्याचा इशारा

अरबी समुद्रात वादळी वारे निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून मंगळवारी दुपारी वाऱ्यांचा वेग वाढल्याने समुद्रावर धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. हा धोका लक्षात घेऊन मुंबई ते मोरा बोटसेवा दुपारी दोननंतर काही कालावधीकरिता बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. या संदर्भात मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रभाकर पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.