करावेतील घरांत पाणी, रस्ते पाण्याखाली; हार्बर रेल्वेचाही खोळंबा

नवी मुंबईत सुरू असलेला संततधार पाऊस सलग चौथ्या दिवशीही न थांबल्यामुळे नवी मुंबईकरांचे हाल झाले. काही भागांमध्ये घरांत पाणी शिरले. शीव-पनवेल मार्ग तुर्भे परिसरात जलमय झाल्यामुळे, ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याने आणि रेल्वे सेवाही विलंबाने सुरू असल्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रेड अलर्ट घोषित करण्यात आल्यामुळे नोकरीनिमित्त मुंबईत जाणाऱ्यांनी घरीच राहणे पसंत केले. घराबाहेर पडलेल्यांची मात्र तारांबळ उडाली. शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाचा जोर वाढताच पाणी साठत होते आणि जोर कमी होताच पाण्याचा निचरा होत होता. सकाळी भरतीच्या वेळेत जोरदार पाऊस पडल्याने शहरात पाणी साचले. करावे गावात पामबीच मार्गालगत असलेल्या घरांजवळून पाणी ज्वेल ऑफ नवी मुंबई शेजारीला छोटय़ा तलावात जाते. परंतु तेथील सिमेंटचा पाइप लहान आहे. त्यात कचरा अडकल्याने पाण्याचा नीटसा निचरा झाला नाही आणि पामबीच मार्गालगत राहणाऱ्या मनोज म्हात्रे, मितेश म्हात्रे, अरुण म्हात्रे यांच्या घरांमध्ये पाणी शिरले, असे अमित मढवी या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यांच्या घरांतील सामानाचे नुकसान झाले.

ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली उड्डाणपुलाखालील रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे ऐरोली व मुलुंडकडे जाणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. शहरामधील शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर सखल भागांत पाणी साचले. शहरात बेलापूर डेपो येथे मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने बसचालकांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागले. तेथील प्रवाशांचे हाल झाले. त्यांना पावसात ताटकळत बसची प्रतीक्षा करावी लागली. कोपरखैरणे तसेच तुर्भे परिसरात व तुर्भे चौक या ठिकाणी काही प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील भुयारी मार्गाच्या ठिकाणी महापालिकेने पंप लावल्यामुळे या पहिल्याच पावसात निर्माण झालेली पाणी साचण्याची समस्या सध्या दूर झाली आहे.

सोमवारी तुर्भे येथील गणपती पाडा परिसरात जोरदार पावसामुळे माती खचून घर कोसळले होते. तिथे पालिका विभाग अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले. मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत मोरबे धरण परिसरात एकूण १६०१.२ मि.मी. पाऊस पडला. मोरबे धरण ८८ मीटरला पूर्ण भरते. सध्या ८२.७० मीटर पातळी गाठली असून धरण ९३.९७ टक्के भरले आहे.

‘तुर्भे येथील गणपती पाडा येथील नाल्याशेजारच्या व डोंगर उतारावरील १२ घरांना पावसाळा सुरू होण्याआधीच नोटिसा बजावल्या होत्या. पावसाळ्यापुरते घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे तुर्भे विभाग अधिकारी अंगाई साळुंखे यांनी सांगितले. तुरळक घटना वगळता मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या नाहीत. स्थिती नियंत्रणात आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणभवन परिसरात पाणी साचले होते. त्याचाही निचरा झाला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., यांनी दिली.

पाणी साचलेली ठिकाणे

कोकणभवन परिसर, बेलापूर बसडेपो, सेक्टर ४, प्रियदर्शन सोसायटी सेक्टर ४८, रंगोली हॉटेल परिसर, नेरुळ सेक्टर ३ या ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.

३ झाडे कोसळली

शहरात ऐरोली सेक्टर ३ व ४, नेरुळ पारसिक हिल व सीबीडी सेक्टर ४ येथे झाडे कोसळली. नेरुळ सेक्टर २० येथील डी ११६ येथे शॉर्टसर्किट झाले.