24 January 2020

News Flash

महापुराचा धडा

डोंगरात पडणारे पावसाचे पाणी अधिक वेगाने खाडीकडे झेपावत आहे.

|| विकास महाडिक

डोंगरात पडणारे पावसाचे पाणी अधिक वेगाने खाडीकडे झेपावत आहे. त्याला योग्य दिशा मिळाली तर ते थेट खाडीकडे जाते अन्यथ: ते शहराच्या अनेक भागांत घुसत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. असे असताना पालिका काही कायमस्वरूपी उपाययोजना करताना दिसत नाही. बेकायदा बांधकामे, अस्ताव्यस्त विकास, पावसाळी पाणी नियोजनाचा अभाव यामुळे पाणी साठण्याची प्रक्रिया दरवर्षी होत आहे. कोल्हापूर, सांगलीसारखी पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच यावर वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांत आलेल्या महापुराचा धडा सर्वच गाव, शहरांनी घेण्याची वेळ आली आहे. घाटमाथ्यांवर असलेल्या या जिल्ह्य़ांतही इतका महाभयंकर महापूर येईल याची कल्पनाही कधी कोणी केली नव्हती. १४ वर्षांपूर्वी आलेला पूर तुलनेने इतका मोठा नव्हता. महिन्याभरात पडणारा पाऊस नऊ दिवसांत पडला. कनार्टकमधील आलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा, अन्य धरणांचा विसर्ग यामुळे या जिल्ह्य़ांची महापुराने दैनावस्था केली. महापुराच्या कारणांचा शोध येत्या काळात घेतला जाईल, पण मुंबईच्या जवळ असलेल्या नवी मुंबई शहरालाही या निमित्ताने धोक्याची घंटा आहे. भौगोलिकदृष्टय़ा समुद्रसपाटीपासून तीन मीटरखाली असलेल्या या शहरात भविष्यात कोल्हापूर, सांगलीसारखा पाऊस झाला तर कठीण परस्थिती उद्भवणार आहे. तीस, चाळीस वर्षांपूर्वी नवी मुंबईतील ऐरोली, वाशी, तुर्भे नोडमध्ये संततधार पावसाने कोल्हापूरसारखी स्थिती निर्माण होत होती. त्या वेळी सिडकोने या दरवर्षी साचणाऱ्या पाण्यावर काही उपाययोजना काढून पाण्याचा निचरा लगेच होईल अशी व्यवस्था केली. नवी मुंबई हे बेट आहे. समुद्र आणि डोंगर यांच्यामधील १०० किलोमीटर अंतरात हे शहर वसविण्यात आले आहे. डोंगरातून येणाऱ्या मुसळधार पावसाच्या पाण्याला वेळीच वाट करून दिली नाही तर हे पाणी शहरात घुसते. ते पाणी साचण्याची ठिकाणे तयार झाली आहेत. दुर्दैव म्हणजे गेली अनेक वर्षे शहरात पाणी साचण्याची ठिकाणे कायम आहेत. पालिका प्रशासन या ठिकाणी पाणी साचल्यानंतर पाणी उपसण्यासाठी पंप यंत्रणा लावून वेळ मारून नेण्याची कसरत गेली अनेक वर्षे करीत आहे, मात्र दर वर्षी त्याच ठिकाणी पाणी साचल्यानंतर पालिका त्यावर कायमस्वरूपी उपाय का काढत नाही, असा प्रश्न अद्याप या शहरातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने अथवा सामाजिक संस्थांनी विचारल्याची नोंद नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस पडला की पालिकेचे अधिकारी त्या पाणी साचणाऱ्या ठिकाणी जातात आणि पाणी उपसा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दरवर्षीच्या पावसाळ्यात दिसून येते. उदाहरणार्थ ऐरोली येथील रेल्वे पुलाच्याखाली दरवर्षी संततधार पावसात चार ते पाच फूट पाणी दरवर्षी साठते. पण त्यावर उपाय करण्यास पालिका अपयशी ठरलेली आहे. नवी मुंबईला ७८ किलोमीटर लांबीची डोंगररांग आहे. या डोंगरमाथ्यावर ३००पेक्षा जास्त दगडखाणींना परवानगी देऊन सिडकोने हे डोंगर ‘ओकेबोके’ करण्याचे पाप शहराच्या माथी अगोदरच मारले आहे. शहर वसविताना लागणारे बांधकाम साहित्य जवळ उपलब्ध व्हावे यासाठी या दगडखाणींना परवानगी देण्यात आली. त्यामुळे डोंगर उजाड केले गेले आहेत. त्यावर माती आणि झाडांचा थांगपत्ता नाही. डोंगरात पडणारे पावसाचे पाणी अधिक वेगाने खाडीकडे झेपावत आहे. त्याला योग्य दिशा मिळाली तर ते थेट खाडीकडे जाते अन्यत: ते शहराच्या अनेक भागांत घुसत असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यात ‘एमआयडीसी’ भूखंड विकून केवळ नफा कमविण्यात मग्न आहे. नवी मुंबईतील जमिनींना मिळणाऱ्या प्रचंड भावामुळे ‘एमआयडीसी’ने डोंगराच्या पायथ्याखालील भूखंड जैसे थे स्थितीत विकले आहेत. उद्योजकांनी त्या ठिकाणी कारखाने सुरू केले आहेत. डोंगरातून येणारे पावसाचे पाणी या कारखान्यात साचत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. कारखान्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात येणाऱ्या भिंती हे पाणी दुसरीकडे वळविण्यास मदत करतात. त्यामुळे मुसळधार पावसात एमआयडीसीच्या अनेक भागांत पाणी साठत असल्याच्या घटना घडत असतात. पावसाळा संपल्यानंतर या पाणी तुंबण्याच्या घटनाकडे प्रशासन, उद्योजक दुर्लक्ष करतात.

नवी मुंबईच्या पश्चिम बाजूस ठाणे खाडी आहे. येथील १६ हजार हेक्टर जमिनीवर मातीचा भराव टाकूनच हे शहर वसविण्यात आले आहे. त्यामुळे पाच ते सहा फूट खोदल्यानंतर नवी मुंबईच्या कोणत्याही भूखंडावर पाणीसाठा लागतो. नवी मुंबईच्या भूगर्भात प्रचंड पाणीसाठा आजही आहे. काही तास लागणाऱ्या पावसात नवी मुंबईत पाणी साठण्याच्या अनेक घटना दिसून येत आहेत. याच काळात मोठी भरती असल्यास पाणी साचण्याचा हा धोका अधिक वाढतो. सिडकोने डोंगरातून येणारे पाणी खाडीकडे नेण्यासाठी पावसाळी नाले बांधले आहेत. हे नाले आता अपुरे पडू लागले आहेत. त्यांचे रुंदीकरण आणि संख्या वाढविण्याची गरज आहे. यातील काही नाल्यांत भूमाफिया राडारोडा टाकून हे नाले बुजवीत असतात. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात सपाटीकरण आणि उत्खन्ननामुळे पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तोच प्रकार नवी मुंबईत बेकायदा बांधकामे, अस्ताव्यस्त विकास, पावसाळी पाणीनियोजनाचा अभाव यामुळे पाणी साठण्याची प्रक्रिया दरवर्षी होत आहे. कोल्हापूर सांगलीसारखी पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच यावर वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

First Published on August 13, 2019 1:26 am

Web Title: heavy rainfall maharashtra flood mpg 94
Next Stories
1 दुधापाठोपाठ भाजीटंचाई
2 राष्ट्रवादीचे निरीक्षक नाईकांच्या दरबारात
3 शहरात एकही खड्डा नाही!
Just Now!
X