मुसळधार पावसामुळे खड्डे पडण्यास सुरुवात; उड्डाणपुलावरील दुरुस्तीत अडचणी, डांबरीकरणासाठी ८० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी

नवी मुंबई</strong> : शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर भविष्यात एकदेखील खड्डा दिसणार नाही, हा दुरुस्ती-देखभाल पाहणाऱ्या कंपनीचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. अर्थात महामार्गावरील उड्डाणपुलांवरील डांबरीकरणासाठी यंदा ८० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. परंतु, तिचा काही उपयोग होईल, अशी शक्यता नसल्याचे मत काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे. गेले १५ दिवस अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दुरुस्तीकामे पूर्ण करणे कठीण आहे. त्यामुळे आता लहान असलेल्या खड्डय़ांचा आकार येत्या काळात वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलांची दुरुस्ती पावसाळ्याआधी होणे आवश्यक आहे. ती यंदाही झालेली नाही. त्यामुळे पावसाच्या माऱ्याने रस्त्यावरील डांबराचा थर उडून गेला आहे. तो येत्या काही दिवसांत होणाऱ्या मुसळधार पावसात अधिकच निखळण्याची शक्यता रस्तेनिर्मिती प्रक्रियेत महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

रस्ते वाहतुकीतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा शीव-पनवेल महामार्ग दोन वर्षांपूर्वी खड्डय़ांमुळे जर्जर झाला होता. त्यानंतर या मार्गाचे सीमेंटीकरण करण्यात आले. तर उड्डाणपुलांवर डांबरीकरण करण्यात आले. यंदा जूनच्या पहिल्याच आठवडय़ात ‘निसर्ग’ वादळासह झालेला पाऊस वगळता त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात कमी पाऊस झाला. या काळात महामार्गाची दुरुस्ती झाली नाही. जुलैनंतर पावसाचा जोर वाढला. त्यातही १२ ऑगस्टपासून शहरात जोरदार पाऊस पडत असल्याने उड्डाणपुलावरील डांबरी रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी अक्षरश: चर पडत आहेत. रस्त्याच्या सर्वात वरचा थर पावसाने वाहून गेल्याने सर्वत्र खडी उघडी पडली आहे.

काम पावसाळ्यानंतरच रस्त्याची पाच वर्षांची हमी दिलेली आहे. मात्र, वास्तविक ही हमी पाच वर्षांनंतर रस्ते तयार करण्याची असते. हमीकाळात रस्ते खराब झाले तर केवळ डागडुजी केली जाते.  उड्डाणपुलावरील रस्त्यांचे काम पूर्ण होऊन पाच वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. दर पावसाळ्यात खराब होणाऱ्या रस्त्याची फक्त डागडुजी केली जाते. या मार्गावरही आता पावसाळा संपल्यावर काम सुरू करण्यात येणार आहे.

‘डांबराचा पातळ थर आवश्यक’

रस्त्यांची दर काही महिन्यांनी पाहणी करून रस्ते खराब होण्याचे निकष पाहणे गरजेचे आहे, जर खडी उखडणे सुरू झाले तरी या अवस्थेतून पूर्ण रस्ता खराब होण्यास किमान दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यापूर्वीच डांबराचा पातळ थर  दिला गेल्यास नंतर पूर्ण रस्ता दुरुस्तीला लागणारा अफाट खर्च वाचेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, अनेकदा गुळगुळीत रस्ता असताना खर्च कशाला, असा सवाल राजकीय नेत्यांकडून केला जातो. अशा वेळी रस्तेदुरुस्तीची तांत्रिक माहिती अभियंत्यांनी देणे आवश्यक आहे, असे मत एका तज्ज्ञाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

शीव-पनवेल मार्गावरील उड्डाणपुलावरचे काम पाच ते सात वर्षांपासून झालेले नाही.  फक्त खड्डे बुजवले जातात. आता सुमारे ८० कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. याहून अधिक काही आता सांगू शकत नाही.

-किशोर पाटील, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग