विद्यार्थी, नोकरदारांची प्रवासादरम्यान तारांबळ; शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे

गेला आठवडाभर सुरू असलेली संततधार आणि शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी नवी मुंबईकरांची तारांबळ उडवली. सकाळी कामाला जाण्यासाठी निघालेल्या नोकरदारांना पावसाने झोडपले. रेल्वे, रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाल्यामुळे शहर आणि परिसरातील जनजीवन मंदावले.

नवी मुंबईत शनिवारी व रविवारी पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे अनेकांनी सुट्टी घरातच घालवली. सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिला. अनेक भागांत पावसाचा जोर वाढताच रस्त्यांवर पाणी साचत होते आणि जोर ओसरताच पाण्याचा निचरा होत होता. शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर मार्गावर आणि अंतर्गत रस्त्यांवर सखल भागांत पाणी साचले होते. ऐरोलीतील सखल भागांत पाणी साचले होते. ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे तसेच तुर्भे परिसरात व तुर्भे चौकात काही प्रमाणांत पाणी साचले होते. भुयारी मार्गावर महापालिकेने पंप लावल्यामुळे तिथे पाणी साचले नाही.

‘तीन दिवस सातत्याने पाऊस पडत असला तरी काही तुरळक घटना वगळता मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या नाहीत. झाडे पडली आहेत. पालिकेच्या विभाग कार्यालयांतून व मुख्यालयातून पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे,’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी दिली.

अपघातसत्र सुरूच

  • शीव-पनवेल महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी पहाटे शिरवणे उड्डाणपुलाजवळ एक ट्रक दुभाजकावर आदळून उलटला. कोंबडय़ा वाहून नेणारा टेम्पो सानपाडा उड्डाणपुलावर दुभाजकावर आदळून उलटला. त्यामुळे कोंबडय़ा रस्त्यावर पडल्याचे विजय पाटील या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
  • शहरात दोन ठिकाणी झाडे पडली. ऐरोलीत गाडीला आग लागली.

मोरबे धरण ९२ टक्के भरले

मोरबे धरण परिसरात जोरदार पाऊस पडत असून शनिवारी फक्त एका दिवसात २२३ मिमी एवढा जोरदार पाऊस झाला. मोरबे धरण परिसरात आतापर्यंत एकूण १४५०.२० मिमी. पाऊस पडला आहे. ८८ मीटरला मोरबे धरण पूर्ण भरते. सध्या पातळी ८१.८० मीटरला पोहोचली आहे. मोरबे धरण ९२.९५ टक्के भरले आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर यंदाही मोरबे धरण पूर्ण भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.