जड वाहने व कंटेनरचे शहर म्हणून उरण तालुक्याची ओळख बनू लागली असून बंदरावर आधारित गोदामांची संख्या वाढत असल्याने उरण तालुक्यातील पूर्व विभागालाही वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. याचा परिणाम गणेशोत्सावावर होऊ लागला आहे. त्यामुळे या विभागातील नागरिकांना जड वाहनांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
उरण-पनवेल राज्य महामार्ग ५४ व उरण (जेएनपीटी)ते पळस्पे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब हे दोन्ही महामार्ग जड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचे रस्ते बनले आहेत. या मार्गावर दररोज कोंडी होत असल्याने उरणमधील नागरिकांचे हाल होत आहेत. असे असतानाच उरण तालुक्यातील खोपटा खाडी पलीकडील पूर्व विभागालाही जड वाहनांच्या कोंडीचा फटका बसला आहे. उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी गणेशोत्सावापूर्वी सर्व विभागांची बैठक घेऊन गणेशोत्साव कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश दिले होते. मात्र मागील सात ते आठ दिवसांपासून उरणच्या पूर्व विभागातील खोपटा खाडीपूल, कोप्रोली नाका, चिरनेर या विभागातील वाहतूक कोंडीत वाढ झालेली आहे. त्यामुळे या मार्गाने मुंबई गोवा, पेण-अलिबाग या मार्गावरील प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. खोपटा पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कधीकधी तीन ते चार तास लागत असल्याचे मोठी जुई येथील नितेश पंडित या प्रवाशाने सांगितले. कोप्रोली परिसरातील गोदामांकडून क्षमतेपेक्षा अधिक कंटेनर मागविले जात असून ते गोदामात न घेता रस्त्यावर उभे केले जात असल्याने ही कोंडी होत असल्याचे मत उरणच्या वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांनी व्यक्त केले आहे. अशा दीडशेहून अधिक जड वाहनांवर कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले. उरण तालुक्यातील हा विभाग ग्रामीण भागात मोडत असल्याचे त्यासाठी वेगळे पोलीस नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.