पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांचा निर्धार; पार्किंग सुविधा, स्वच्छता, तलावांचे सुशोभीकरण यावर भर देणार

भविष्यातील पनवेल कसे असेल

पनवेलमधील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकास आराखडा तयार केला जाणार असून त्यातून शहरातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी ‘लोकसत्ता महामुंबई’शी बोलताना व्यक्त केला. पार्किंगची समस्या, तलावांची स्थिती, भविष्यातील पनवेल अशा विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.

पनवेल शहर ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागांत विभागले आहे. यात झोपडपट्टी भागही आहे. सिडकोच्या शहरी भागांतील नागरी समस्याची सोडवण्यात आल्या आहेत. खरी समस्या ११ गावांतील समस्यांची. त्यांच्यासाठी रस्ते, पाणी, वीज या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी एक सल्लागार नेमण्यात येणार आहे. गावे आणि जुन्या पनवेलमधील समस्यांची माहिती घेतली जाईव. त्यावरील उपाययोजना विचारात घेतल्या जातील. राज्य शासनाकडून विकास आराखडा तयार करण्यासाठी एक गट येईल. त्यानंतर कामाला सुरुवात होईल. त्यासाठी आम्ही पूर्वतयारी करून ठेवली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

वाढती वाहने आणि पार्किंग या यापुढे सर्वच शहरांना भेडसावणाऱ्या समस्या ठरणार आहेत. पनवेल शहरात त्याचे नियोजन सध्या सुरू आहे. अस्तित्वात असलेले रस्ते अपुरे पडत आहेत. फडके नाटय़गृहाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत २५ ते ३० लाख रुपये खर्च करून एक वाहनतळ तयार केले जात आहे. त्यामुळे परिसरातील वाहने रस्त्यांवर उभी न राहता या वाहनतळावर पार्क केली जातील. याशिवाय जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित होणाऱ्या शाळांच्या पुनर्विकासात पार्किंग प्लाझा बांधले जाणार आहेत. अंतर्गत भागातील पार्किंग समस्या कमी करण्याचा प्रयत्न आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना सकस आहार

पनवेल पालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांत मिळून १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सकस आहारासंदर्भात इस्कॉन संस्थेशी चर्चा सुरू आहे. त्यांना स्वयंपाकघरासाठी जागा हवी आहे. ती मिळाल्यास संस्था नवी मुंबईतील २७ हजार विद्यार्थ्यांनाही मोफत भोजन देण्यास तयार आहे. हे काम मला फार महत्त्वाचे वाटते, असे आयुक्तांनी सांगितले.