शेखर हंप्रस
पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचे मत
सायबर गुन्ह्य़ांवर आळा येण्यासाठी वेगळ्या पोलीस ठाण्याचा विचार नसला तरी आगामी काळात होऊ शकतो. त्या अनुषंघाने मुंबईतील चार पोलीस ठाणे हद्दीसाठी वेगळे सायबर पोलीस ठाणे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. सायबर सेलमध्ये युवकांचा बुद्धिकौशल्याचा वापर करण्यासाठी यात त्यांचा भरणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या सायबर गुन्हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. एकटय़ा नवी मुंबईत वर्षभरात अशा चार गंभीर सायबर गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. त्यात बिट कॉइन, ऑस्ट्रेलिया येथून बदनामीकारक संदेश पाठवल्याची घटना, प्रसिद्ध रुग्णालयातील डेटा हॅक करणे, बनावट छायाचित्रे बनवून बदनामी करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यंचा समावेश आहे. मात्र एकाही गुन्ह्य़ाची उकल झालेली नाही.
सायबर गुन्ह्य़ांचे वाढते प्रमाण पाहता कडक कायदे करणे आवश्यक आहेत. मात्र ते पोलिसांच्या हातात नाही. त्यामुळे आहे त्याच कायद्याच्या चौकटीत राहून या गुन्ह्य़ांना आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. याशिवाय सायबर तज्ज्ञांची कमतरता भासत आहे. या कारणाने यासाठी वेगळे पोलीस ठाण्याची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुंबईत प्रायोगित तत्वावर सायबर पोलीस ठाणे उभारण्याचा विचार असल्याचे सांगितले. नवीन तंत्रज्ञान अवगत करणे तरुण पिढीला सोपे जाते. त्यामुळे यापुढे राबवल्या जाणाऱ्या पोलीस भरतीत निवड होणाऱ्यांपैकी सायबर विषयात गती असलेल्या तरुणांना या विभागात काम करण्याची संधी दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 12:46 am