|| संतोष जाधव

दीड हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनाच्या पुनरेपणास उच्च न्यायालयाची परवानगी :- वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या कामास नववर्षांत आरंभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. तिसऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता. सुमारे दीड हेक्टरवरील कांदळवने काढून अन्य ठिकाणी त्यांचे रोपण करण्याच्या अटीवर वनखात्याने रस्ते विकास महामंडळाला आधीच परवानगी दिली होती. मार्गदर्शक सूचनांसाठी उच्च न्यायालयात कांदळवने लागवड आणि परवानगी मिळविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने याचिका दाखल केली होती. त्याला उच्च न्यायालयाने १९ डिसेंबर रोजी परवानगी दिली.

वाशी खाडीवरील जुना पूल नवी मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी वापरला जातो. सध्या सहा पदरी खाडीपुलावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाशी खाडीवर तिसरा पूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. या पुलाच्या कामासाठी ७७५ कोटी खर्च येणार आहे. पुलाचे काम एल अ‍ॅण्ड टी कंपनीला देण्यात आले  आहे. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या तिसऱ्या पुलाच्या कामात वाशी खाडी पुलावर पुण्याहून मुंबईच्या दिशेकडे जाणारा एक व मुंबईहून पुण्याकडे जाणारा एक अशा दोन्ही बाजूंना उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. दोन्ही दिशेकडे तयार करण्यात येणाऱ्या पुलावर प्रत्येकी तीन मार्गिका असतील.

उच्च न्यायालयाने रस्ते विकास महामंडळाला परवानगी दिली असताना दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनेही २८१ झाडे काढण्याची परवानगी रस्ते विकास महामंडळाला दिली आहे.

टोलनाक्यांच्या संख्येतही वाढ तिसऱ्या पुलाची निर्मिती झाल्यानंतर अतिरिक्त सहा मार्गिका तयार होणार आहेत. त्यामुळे या नव्याने होणाऱ्या पुलावरही टोलनाके उभारण्यात येतील.

उच्च न्यायालयाने रस्ते विकास महामंडळाच्या कांदळवनाच्या बाबतीत असलेल्या याचिकेवर परवानगी दिली असून वनखात्याला प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. पुढील आठ दिवसांतच वनखात्याकडून काम सुरू करण्याचे पत्र मिळताच कामाचा कार्यादेश देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. – एस. एस. जगताप, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ