वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जगदीश तांडेल, उरण

अतिज्वलनशील पदार्थाची साठवणूक केल्यामुळे मोठय़ा आगींचे व त्यात होणाऱ्या जीवितहानीचे प्रकार सुरूच असल्याने ‘स्फोटकां’च्या तोंडावर असल्याची भीती उरणकरांमध्ये वाढतच आहे. मात्र यावर सुरक्षा उपाययोजना होताना दिसत नाहीत.

ओएनजीसी प्रकल्पानंतर आता जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून या परिसरातील गोदामात शेकडोंच्या संख्येने अतिज्वलनशील पदार्थ असलेल्या कंटेनरचीही साठवणूक केली जात आहे.

या दोन्ही ठिकाणी भीषण आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे काम करणाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशाच प्रकारची घटना पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा एका गोदामात घडली आहे. त्यामुळे उरणमधील अतिज्वलनशील पदार्थाची साठवणूक धोकादायक बनत आहे.

ओएनजीसीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबरोबरच उरण परिसरात अनेक प्रकल्प उभारले गेले. या प्रकल्पात वायू, तेल यांचे उत्पादन व साठवणूक होऊ लागली. त्यामुळे येथील औद्योगिक विकासाबरोबरच धोकेही घेऊन हा विकास आला. २००७ मध्ये ओएनजीसी प्रकल्पातील अतिज्वलनशील तेलाची गळती लागल्याने भयंकर आग लागली होती. त्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, तर २०११ मध्ये द्रोणागिरी नोडमधील एका गोदामात अतिज्वलनशील पदार्थाचे कंटेनर पेटल्याने झालेल्या स्फोटात तीन ते चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गोदामांशेजारील नागरिक भीतीच्या वातावरणात राहत असल्याचे भीती उरणमधील नागरिक सतीश केणी यांनी व्यक्त केली. अशा प्रकारचे पदार्थ साठवून ठेवले जात असताना त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून सुरक्षा यंत्रणा राबविण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांच्याशी संपर्क साधला असता अतिज्वलनशील पदार्थाची साठवणूक करण्याची परवानगी ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिली जाते. त्या वेळी कोणते नियम सांगितले जातात याची आम्हाला माहिती नाही. मात्र त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. तरी नियमाचे पालन केले जात आहे का, याची विचारणा केली जात आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजनांची पाहणी केली जाणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

निर्यात होणाऱ्या मालाची गोदामात साठवणूक करण्याची परवानगी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही अटींवर दिली जाते. मात्र त्यात कोणते पदार्थ आहेत याची माहिती मंडळाला नसते, तर याची सीमा शुल्क विभागाकडे माहिती असते. त्यामुळे याची जबाबदारी मंडळाची नसते. गोदामाला दिलेल्या परवानगीनुसार ही साठवणूक कधीपर्यंत आहे याची माहिती मंडळाकडे असते. 

– राहुल मोटे, उपप्रादेशिक अधिकारी, नवी मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळ