सिडको वसाहती जोडण्याची आग्रही मागणी
पनवेल : शीव-पनवेल महामार्गावर कामोठे, कळंबोली व खारघर ही वाहतूक कोंडीची बेटे तयार होत आहेत. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने या सिडको वसाहती सेवा रस्त्यांनी जोडण्याची आग्रही मागणी होत आहे. मुळात या वसाहतींच्या नियोजनातच हे सेवा रस्ते असताना ते अद्याप प्रत्यक्षात उतरलेले नाहीत.
याबाबत सिडकोला विचारण केल्यानंतर सेवा रस्त्यांच्या कामामध्ये येणाऱ्या कांदळवनामुळे हे काम रखडले आहे. मात्र नवीन संरेखनाच्या आराखड्यात पुन्हा नव्याने सेवा रस्त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
कामोठे वसाहतीमध्ये सुमारे २५ हजार, कळंबोली वसाहतीमधील ३० हजार आणि खारघर वसाहतीमध्ये ३५ हजार अशी ९० हजार हलकी वाहने सेवा रस्ते झाल्यास महामार्गावर येणार नाहीत. सद्यपरिस्थितीत या वाहनांना महामार्गावरून वळसा घालून जावे लागत आहे, त्यामुळे इंधनबरोबर त्यांचा वेळही खर्च होत आहे. वसाहती एकमेकांना सेवा रस्त्याने जोडल्यास महामार्गावरील ताण कमी होईल आणि अवजड वाहतुकीचा फटका लहान वाहनांना बसणार नाही. सध्या एकाच मार्गिकेवरून अवजड व हलकी वाहने जात असल्याने हलक्या वाहनांना कोंडीचा त्रास रोजच सहन करावा लागत आहे. कळंबोली सर्कल, खारघरचे प्रवेशव्दार, रोडपाली सिगन्ल, कळंबोली उड्डाणपूल, नावडे फाटा, ही कोंडीची मुख्य केंदे्र बनली आहेत.
सिडकोने वसाहतींचे नियोजन करतानाच या वसाहती एकमेकांपासून जोडण्याचे नियोजन केले होते. मात्र ते कागदावर राहिले आहे. हा आराखडा पर्यावरण विभागांच्या विविध मंजुरींमुळे प्रत्यक्षात आला नाही. पनवेल पालिकेने या वासाहतींतील आरोग्य आणि शहर स्वच्छता वगळता इतर सेवासुविधांचे सिडकोकडून हस्तांतरण करून घेतले नाही. त्यामुळे सिडकोकडून येथील परिवहन यंत्रणा सक्षम झाल्यानंतरच हस्तांतरकरावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी लवकरच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे खारघर येथील नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनीसुद्धा खारघर ते रोडपाली या सेवारस्त्यासाठी लेखी पत्रव्यवहार सिडको मंडळाच्या नियोजन विभागात केला आहे.
खारघर स्पॅगिटी ते रोडपाली पुरुषार्थ पेट्रोलपंपापर्यंत सेवा रस्त्यासाठी नियोजन आहे. पर्यावरणाच्या मंजुरीसह नवीन संरेखनाचा शोध घेण्याचे काम सिडको मंडळाच्या नियोजन विभागात सुरू आहे.
-प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको मंडळ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 27, 2021 12:03 am