वाहने सिग्नलवर पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त काळ ताटकळत

बाराशे कोटी रुपये खर्च केल्यानंतरही सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द ते बेलापूर या पट्टय़ात खूप मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाशीपासून सुरू होणाऱ्या पामबीच मार्गावर वाहतूक वळविण्यात आली असून त्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळी चांगलीच वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पामबीच मार्गाची मजा घेणाऱ्या वाहनचालकांना या कोंडीचा सामना करावा लागत असून सिग्नलवर पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागत आहे.

वाशी सेक्टर १७पासून बेलापूर सेक्टर ११ पर्यंत सिडकोने तयार केलेल्या ११ किलोमीटर पामबीच मार्गाची तुलना मुंबईतील मरीन ड्राइव्हच्या क्वीन नेकलेसशी केली जाते. त्यामुळे काही मिनिटांत बेलापूर किंवा वाशी गाठण्याची सवय असलेल्या या मार्गावरील नेहमीच्या वाहनचालकांना गेली चार दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने ते काहीसे अस्वस्थ झाले आहेत. सायन-पनवेल महामार्गावर वाशी ते बेलापूर या दरम्यान रस्ता खराब झाला असून उड्डाणपुलांवर खड्डे पडले आहेत. या मार्गाचा टोल वसूल करणाऱ्या कंपनीला हलक्या वाहनांपासून टोल घेण्यास सरकारने मज्जाव केल्यापासून त्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मध्यंतरी पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त करून घेतले, मात्र अधून मधून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे हे दुरुस्त केलेले खड्डे पुन्हा जैसे थे होत आहेत. हीच स्थिती बेलापूर व शिरवणे उड्डाणपुलांवर होत असल्याने या मार्गावरून जाणारी वाहतूक पोलीस पामबीच मार्गावरून वळवीत आहेत. त्यामुळे पामबीच मार्गावर सानपाडा, नेरुळ, बेलापूर या सिग्नलवर लांबच लांब रांगा दिसून येत असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.