कोपरा परिसर पाच फूट पाण्याखाली

पनवेल : शीव-पनवेल महामार्ग सोमवारी दुपारी पाण्याखाली गेला. पांडवकडा धबधब्याहून कोपरा खाडीत जाणारे पावसाळी नाले तुडुंब वाहू लागल्याने पाणी थेट महामार्गावरच आले. त्यामुळे कोपरा गावाजवळील बसथांब्यापासून अर्धा किलोमीटरचा परिसर पाच फूट पाण्याखाली गेला. त्यामुळे कोपरा ते बेलापूर अशी वाहनांची रांग शीव-पनवेल महामार्गावर लागल्याने मोठय़ा वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. दुपारी काही तास पनवेल बाजूकडे जाण्यासाठी एकेरी मार्गिका सुरू होती. मात्र, वसाहतीमध्ये शिरण्यासाठी बेकायदा केलेला मातीचा भरावामुळे ही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

अनेक वाहनचालकांना पाणी नेमके कुठून येतेय याचा अंदाज न आल्याने पाण्यात उभी केलेली वाहने पाण्यावर तरंगू लागली. अनेक वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली. कोपरा बस थांबा संपूर्णपणे पाण्याखाली गेला होता. तर कोपरा येथील उड्डाणपुलाखालचा निम्मा भाग पाण्याखाली गेला.

सोमवारी साडेदहा वाजल्यानंतर पावसाने जोर धरला. अतिवृष्टीने पांडवकडा व खारघरच्या डोंगररांगांमधून खाडीकडे जाण्यासाठी पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने सोमवारी महामार्ग पाण्याखाली गेल्याचा अंदाज सिडकोच्या अभियंत्यांनी लावला आहे. खारघरमधील डोंगररांगा आणि पांडवकडा धबधब्यातून निघणारे पाणी या दोनही पाण्याचे नैसर्गिक नाले महामार्गानजीक एकत्रित होतात. हेच नाले सोमवारी तुडुंब भरून वाहात होते. याच नाल्याच्या पाण्याने खाडीकडे जाण्यासाठी शीव- पनवेल महामार्गावर आपली वाट धरली. महामार्गावरील पाण्याचा प्रवाह पाहून अनेकांना २६ जुलै २००५ चा महाप्रलय  आठवला.

महामार्गाच्या बाजूला असणारे पावसाळी नाले बांधण्याचे काम बंद असून उलट वसाहतींमध्ये शिरण्यासाठी येथे मातीचे भराव केले जात असल्याचा फटका सोमवारी साचलेल्या पूरसदृश परिस्थितीमध्ये जाणवला.

खारघर टोलनाका परिसरात वसाहतीमध्ये शिरण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव केला आहे. कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी न घेता भराव रातोरात झाला आहे. महामार्गालगत उभारलेल्या हॉटेलांमध्ये व मोठय़ा शोरूममध्ये शिरण्यासाठी खासगी आस्थापनांनी खर्च करून हा बेकायदा मातीच्या भराव करून या परिसराचा विकास केला आहे. नेमका हाच विकास सोमवारी सर्व प्रवाशांना आणि वाहनचालकांना नडला.

सिडको मंडळाच्या मुख्य अभियंत्यापासून अधीक्षक अभियंत्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. गोल्फ कोर्स येथे पर्जन्यमापक यंत्रातून सिडको अभियंत्यांना मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी साडेदहा ते दुपारी बारा वाजता या दीड तासांमध्ये सर्वाधिक ८६ मिलिमीटर पाऊस खारघरमध्ये झाल्याने महामार्गावरील नैसर्गिक नाले ओसंडून वाहिले. याच नाल्याचे पाणी महामार्गावर आल्याने पूरसदृश परिस्थिती झाल्याचे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले. समन्वय ठेवण्यासाठी एमएसआरडीसी, मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, नवी मुंबई पालिका, पनवेल पालिका, सिडको मंडळ व ठाणे पालिका या विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. पनवेल पालिकेच्यावतीने एस.सी. पाटील या अधिकाऱ्याला समन्वयासाठी नेमण्यात आले होते. त्यांची सातारा येथे बदली झाल्याने  महामार्ग पाण्याखाली गेल्यावर येथे भेट दिली नाही.

पाण्याचा निचरा होण्यासाठी ६० मीटर रूंदीचे आणि चार मीटर उंचीचे मोठे नाले सिडकोने बांधले आहेत. या नाल्यांमुळे वसाहतीला पाण्याची झळ बसली नाही. मात्र नाल्याला लहानसा तडा गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाने शीव-पनवेल महामार्गालगत बांधलेले नाले वसाहतीमधील नाल्यांप्रमाणे असणे अपेक्षीत आहे.

-रमेश गिरी, अधीक्षक अभियंता, सिडको मंडळ