पूनम सकपाळ

बेलापूर

(प्रभाग क्रमांक १०१, १०२, १०३, १०४, १०५, १०६)

नवी मुंबईला पारसिक डोंगररांग लाभली आहे. लोकांना सामावून घेण्याची मुंबईची क्षमता कमी पडू लागली म्हणून नवी मुंबईच्या उभारणीचा आराखडा उतरला. १९७३ साली सिडकोने जमीन संपादित केली. त्याआधी या जागेवर जंगल होते. ही जागा निसर्गसंपदेने नटलेली होती. विकासानंतर हे सारे चित्र बदलत गेले. डोंगराळ भागातील काही जागांचे सपाटीकरण करून रस्ते बांधण्यात आले. काही भूखंड मोकळे ठेवण्यात आले. भूखंडांवरील ५० टक्के भागांत बंगले आहेत. उरलेल्या ५० टक्के भागाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची मागणी पुढे येत आहे. मागील वर्षी बेलापूर येथील धारण तलावातील वर्षांनुवर्षे गाळ न काढलेल्या भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते. गेली १५ वर्षे धारण तलावात असलेल्या कांदळवनामुळे त्यातील गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरात पाणी तुंबले होते. या धारण तलावात असलेल्या कांदळवनामुळे महानगरपालिकेला धारण तलावाची स्वच्छता करण्यात अडचणी येत आहेत, तर मलनिस्सारण वाहिन्याही जुन्याच आहेत.

सुविधाही हव्यात

२५ वर्षांपासून बंगले बांधून तयार आहेत; पण त्या ठिकाणी पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. राधाकृष्ण मंदिराजवळ पालिकेने उद्यान विकसित केले आहे; परंतु त्यात पुरेशा सुविधा नाहीत. नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, चिमुकल्यांसाठी खेळाचे साहित्य, खुली व्यायामशाळा, सायकल मार्गिका, जॉगिंग ट्रॅक आणि धरणाची दुरुस्ती करून पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. प्राणिसंग्रहालय हा पर्यटन स्थळातील महत्त्वाचा घटकही विकसित करावा, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.

विद्यमान नगरसेवक

* प्रभाग १०१ सरोज पाटील  शिवसेना</p>

* प्रभाग १०२    अशोक गुरखे  भाजप

* प्रभाग १०३   सुरेखा नरबागे भाजप

* प्रभाग १०४   जयाजी नाथ    भाजप

* प्रभाग १०५    भारती कोळी  शिवसेना

* प्रभाग १०६ पूनम पाटील काँग्रेस</p>

पक्षी अभयारण्य हवे

* प्रभाग १०१ मध्ये अग्रोळी गाव, राहुल नगर, एकता विहार, निलगिरी गार्डन, बालदुबाई नगर या भागांचा समावेश आहे. या ठिकाणी तलावांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

रस्त्याची कामे सुरू आहेत. या ठिकाणी स्मशानभूमीचे कामही मार्गी लागलेले आहे. मात्र, येथील तलावात नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. तसेच पारसिक हिल येथे कासपठारसारखे विविध प्रकारची फुलझाडे लावण्याची मागणी होत आहे.

* सेक्टर-३० आणि ३१ येथे मोकळा भूखंड उपलब्ध आहे. मात्र, सिडकोकडून तो अद्याप हस्तांतरित झालेला नाही. प्रभाग १०२ मध्ये सेक्टर ३ आणि २चा काही भाग सेक्टर-९ या भागांचा समावेश होत आहे. या ठिकाणी छोटी-मोठी १४ ते १५ उद्याने आहेत. त्यामुळे नागरिकांना मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सेक्टर-९ येथे सिडकोचे निसर्गउद्यान आहे. याशिवाय येथे पक्ष्यांसाठी अभयारण्य प्रस्तावित आहे. त्याबाबत विकास आराखडातही तशी तरतूद करण्यात येत आहे. महामार्गालगत वृक्षारोपणाची मागणी होत आहे.

प्रभागनिहाय समस्या.

मासळी विक्रेते रस्त्यावरच

गावात मोठय़ा प्रमाणात मच्छीमार, मासळी विक्रेते राहतात. भागात मासळी मंडईची मागणी आहे. मात्र, त्यासाठीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. मासेविक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे; पण या ठिकाणी  ५० मासे विक्रेते बसण्याची सुविधा आहे. गावात दीडशे ते दोनशे मासळी विक्रेते आहेत. त्यामुळे उर्वरित विक्रेत्यांना रस्त्यावरच व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या अधिक होत असते. प्रभाग १०६ मध्ये बेलापूर आणि शहाबाज गाव येते. या प्रभागात झोपडपट्टी पुनर्वसनाची मागणी होत आहे. तसेच या प्रभागात एलईडी पथदिवे नसल्याने बहुतेक ठिकाणी अंधार पसरलेला असतो.

भूमिगत टाकलेल्या वीजवाहिन्यांची कामे निकृष्ट दर्जाची झालेली

आहेत. या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्याही बदललेल्या नाहीत. त्यामुळे मलमिश्रित पाणी दिवाळे गाव खाडीत सोडले जात आहे. कांदळवन संरक्षणाचे कारण देऊन येथे स्वच्छता केली जात नाही.

बेलापूर भागात महिला आरक्षण

बेलापूर विभागात प्रभाग क्रमांक १०१ सोडून इतर प्रभागांत महिला आरक्षण आहे. त्यामुळे या प्रभागात महिलांचे वर्चस्व असणार आहे. प्रभाग १०१ मध्ये सध्या शिवसेनेच्या सरोज पाटील नगरसेविका असून या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण आहे. प्रभाग १०२ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे. प्रभाग १०३ मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षित आहे. प्रभाग १०४ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आहे. क्रमांक १०५ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित झाले आहे.

पुलाचे काम रखडलेले

या भागात सेल्फी पॉइंट प्रस्तावित आहे, तसेच आयकर कॉलनी ते बेलापूर स्कायवॉक तसेच अग्रोळी ते शहाबाज पादचारी पुलाचे दोन वर्षे रखडलेले काम सुरू करण्यात आले होते. मात्र, काही कारणानिमित्त हे काम सध्या बंद आहे. त्यामुळे ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. याशिवाय मैदानाची मागणी होत आहे.

आमच्या आग्रोळी गावात मैदान उपलब्ध नाही. सेक्टर-३०, ३१ येथे मैदानासाठी मोकळा भूखंड आहे. मात्र, अद्याप सिडकोकडून हस्तांतरण झालेले नाही. येथे तातडीने मैदान उपलब्ध करून द्यावे.

– मनोज डोंगरे

आमच्या प्रभागात पालिकेने माता बाल रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी केवळ प्राथमिक उपचार देण्यात येतो. आधुनिक आरोग्य सुविधादेखील उपलब्ध करून द्यावी.

– अजय सागवेकर

सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी बहुउद्देशीय सभागृह उपलब्ध नाही. वाहनतळांची समस्या आहे. मलनिस्सारण वाहिन्या बदलण्यात आलेल्या नाहीत.

– इजाज खान