पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील टाकीला छिद्र

पनवेल : नाशिक येथील करोना रुग्णालयात प्राणवायू गळतीमुळे प्राणवायू न मिळाल्याने २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातही प्राणवायू टाकीच्या गळतीचा प्रकार मंगळवारी घडला. मात्र वेळीच ही गळती लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

प्राणवायूच्या टाकीतील सूक्ष्म छिद्रातून गळती होत होती. निरीक्षणासाठी नेमलेल्या तज्ज्ञांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने आपत्ती यंत्रणेच्या साहाय्याने हे छिद्र बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र गळतीची अफवा पसरल्याने रुग्णांसह नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला होता.

ही घटना समजल्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. प्राणवायू साठय़ावर नियंत्रणासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यामुळे अनर्थ टळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्राणवायूच्या टाकीतील तापमान नियंत्रण आणि बिघाडावर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी दीपक गुरव, प्रथमेश भगत, अक्षय राणे या तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक गुरव मंगळवारी नियंत्रण करत असताना त्यांना प्राणवायू टाकीतील एका वाहिनीतून सूक्ष्म छिद्रातून प्राणवायूचे फवारे लहान प्रमाणात उडताना दिसले. याबाबत त्यांनी तत्काळ वैद्यकीय अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे यांना कळविले. लोहारे यांनी आपत्ती यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक, जेएसडब्ल्यू कंपनी आणि रायगड कार्बाईड या कंपनीच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून ही वाहिनी दुरुस्त करण्यात आली. दुरुस्तीनंतर सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कामोठे एमजीएममध्येही दोन दिवसांपूर्वी गळती

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूच्या टाकीतही सूक्ष्म गळतीचे छिद्र आढळले होते. या रुग्णालयातील जैविक वैद्यकीय अभियांत्रिकी विभागाच्या तज्ज्ञ मानसी माने यांच्या पथकाने ही गळती वेळीच रोखली आणि रात्रभर हे पथक येथे गळती होऊ  नये म्हणून झटत होते. १२ तासांच्या प्रयत्नानंतर येथील गळती वेळीच रोखल्याने एमजीएम रुग्णालयाचे संचालक डॉ. सुधीर कदम यांनी अभियंता माने व त्यांच्या पथकाच्या कामाचे कौतुक केले. रुग्णालयात ७०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.