सिडकोचा महत्वपूर्ण निर्णय; ३४१७ जणांचा एक कोटी सात लाखांचा भरणा

नवी मुंबई : सिडकोने राबवलेल्या महा गृहनिर्मितीतील लाभार्थ्यांनी गेल्या वर्षी विलंब शुल्क माफ करण्याअगोदर भरलेल्या ३४१७ जणांचे एक कोटी सात लाख रुपये सिडको परत करणार आहे. ग्राहकांची रक्कम परत करण्याची सिडकोची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अतिरिक्त आलेली रक्कम ही शेवटच्या देयकातून वळती केली जात होती.

सिडकोने महागृहनिर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे तळोजा, खारघर, कळंबोली, कामोठे, घणसोली आणि द्रोणागिरी येथे सिडको एकाच वेळी २५ हजार घरे बांधत आहे. या घरांची सोडत २०१८-१९ मध्ये काढण्यात आली असून साडेसात हजार लाभार्थ्यांना घरे देण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू होणार आहे. या घरांचा देखभाल खर्च भरण्यासाठी सिडकोने नोटीस देण्यास सुरुवात केली आहे.

करोनाकाळात सिडकोने किमान विलंब शुल्क तरी लावू नये अशी मागणी गेल्या वर्षी अनेक लाभार्थ्यांनी केली होती. तेव्हा सिडकोने करोना काळात विलंब शुल्क लावणार नाही असे

जाहीर केले होते, पण तोपर्यंत ३४१७ लाभार्थ्यांनी ५ व ६ व्या हप्त्यावरील विलंब शुल्क भरलेले होते. ही एकूण १ कोटी ७ लाखांची रक्कम आहे. सिडकोने हे विलंब शुल्कही त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीने हे विलंब शुल्क भरण्यात आले होते, त्याच पद्धतीने ते परत करण्यात येणार आहे. यात २६८९ अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी आहेत, तर ७२८ हे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील आहेत.

करोनाकाळातील टाळेबंदीचा सिडकोने नेहमीच सहानभूतीने विचार केला आहे. गेल्या वर्षी करोनाकाळात विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण त्याचा लाभ ५ व ६ वा हप्ता भरणाऱ्या लाभार्थीना झाला नाही. त्यांची ती रक्कम परत करण्याचा सिडकोने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

– डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको