फसवणूक करणाऱ्या टोळीला दोन वर्षांनंतर अटक

नवी मुंबई : बनावट कागदपत्र जमा करीत एका अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थेकडून ५२ लाखांचे गृहकर्ज घेत त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. आरोपी सर्व शिक्षित असून त्यातील सूत्रधार हा  संगणकतज्ज्ञ आहे.  श्रीधर नरोला, सत्येन पडवळ, हितेश वेड ऊर्फ संजय सावंत आणि पावन सिन्हा ऊर्फ अजय शेट्टी असे अटक आरोपींची नावे आहेत.

बजाज फायनान्स या अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थेने २०१८ मध्ये तक्रार केली होती. दोन वर्षे आरोपींचा शोध सुरू होता. आरोपींनी बनावट पॅन कार्ड, आधारकार्ड, ओळखपत्रे तयार करून त्यांचा व्यवसाय दाखवून त्या व्यक्तीच्या नावाने घर व दुकान भाडेतत्त्वावर घेतले. त्याआधारे त्यांनी बँक खातेही काढले. त्यानंतर एका सदनिका विक्री करणाऱ्यास गाठले. त्या सदनिकेचा व्यवहार ठरवून काही आगाऊ  रक्कमही दिली व उर्वरित रकमेसाठी बँकेचे कर्ज घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे विक्री करारनामा करण्यात आला. याच करारनाम्याची नक्कल करीत गृहकर्जांची मागणी केली. तपासणीनंतर पुरावे सबळ वाटल्याने त्यांच्या बँक खात्यात गृहकर्जाची रक्कम जमा झाली. ही रक्कम काढून त्यांनी बँकेचे काही हप्ते भरले. त्यामुळे संशय आला नाही.

मात्र काही महिन्यांनी हप्ते बंद झाले. अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थेने ज्या घरासाठी कर्ज घेतले तेथे विचारणा केली असता मूळ घरमालकाने पैसे न दिल्याने पुढील प्रक्रिया केली नसल्याचे सांगितले. दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट निघाली.

दोन वर्षांपासून पोलीस या टोळीचा शोध घेत होते. काही तांत्रिक तपासाअंती पोलिसांना त्याचा तपास लागल्यानंतर त्यांना मीरारोड येथून अटक करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. आरोपींनी ही सर्व रक्कम विविध महागड्या गाड्या, दुचाकी आणि गृहउपयोगी साहित्य खरेदी करण्यात खर्च केली. आणखी गरज पडल्यास त्यांनी त्या कागदपत्रांच्या आधारे कर्जावर वस्तू घेतल्या व त्या स्वस्तात विकून त्यातून पैसे कमावले.

आरोपी सराईत

यातील सूत्रधार श्रीधर नरोला हा उच्च शिक्षित असून त्याच्यावर या पूर्वीही कस्तुरबा पोलीस ठाण्यात दोन तर चेंबूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. सत्येन पडवळ याच्या विरोधातही नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हितेश वेळ यानेच तोतया संजय सावंत म्हणून बँकेकडून कर्ज घेतले असून त्याच्या विरोधातही मीरारोड आणि बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चौथा आरोपी पावन सिन्हा याने मूळ सदनिकाधारक ऐवजी स्वत:च बनावट खात्याद्वारे पैसे घेतलेले आहेत. त्याच्या विरोधातही ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.