विमानतळ, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्कमुळे अधिक मागणी

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे फेब्रुवारीत झालेले भूमिपूजन, बेलापूर-पेंदार मेट्रो मार्गाचे प्रगतिपथावर असलेला काम, नेरुळ-उरण रेल्वे मार्ग सुरू होण्याची आशा आणि दृष्टीक्षेपात आलेला शिवडी-न्हावाशेवा समुद्री मार्ग यामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण, द्रोणागिरी, खारघर, कामोठे, कळंबोली या भागात गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत गतवर्षीच्या तुलनेत अधिक घरविक्री झाली. गृहविक्रीत गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्के वाढ झाली असून यंदा १३ हजार ५९० घरे या क्षेत्रात विकली गेली.

महामुंबई क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. विमानतळ, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, कॉर्पोरेट पार्क या शासकीय प्रकल्पांबरोबरच काही मनोरंजन केंद्रे तसेच आरोग्य सेवांची उभारणी होत आहे. गेली २० वर्षे केवळ चर्चेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे १८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. विमानतळ होणार या चर्चेमुळे यापूर्वी या भागांतील जमिनी व घरांचे दर वाढले होते. अनेकांनी महामुंबई क्षेत्रात गुतंवणूक केली आहे. काही जणांनी तर मुंबईतील छोटी घरे विकून याच भागात मोठी घरे घेतली आहेत. ज्यांचे स्वत:चे घर नव्हते त्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे विमानतळाचे भूमिपजून झाल्यानंतर येथील बांधकाम व्यवसायात चैतन्य पसरले. बंद पडलेल्या गृहप्रकल्पांनी वेग घेतला आहे तर अनेक मोठय़ा विकासकांनी परवडणाऱ्या घरांवर लक्ष केंद्रित केले आहे.

विमानतळ कामाच्या टेक ऑफ बरोबरच बहुप्रतीक्षीत नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील पहिला टप्पा येत्या काळात सुरू होणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखविल्यास पावसाळ्यापूर्वी खारकोपपर्यंत लोकल रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. या रेल्वेचा सर्वाधिक फायदा हा उलवा व द्रोणागिरी या सिडकोच्या विकसित भागांना होणार आहे. काही जमिनींच्या संपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने ही रेल्वे उरणपर्यंत जाण्यास आणखी कालावधी लागणार आहे. बेलापूरहून थेट तळोजा पेंदापर्यंत नवी मुंबई मेट्रो रेल्वेचे काम प्रगतिपथावर आहे. डक्ट बांधण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून आता केवळ सिग्नलचे काम बाकी आहे. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांचा प्रश्न निर्माण झाल्याने हा प्रकल्प दोन वर्षे रखडला आहे.

या तीन प्रकल्पांमुळे महामुंबई क्षेत्रात घर खरेदी करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. त्यात पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत घर आरक्षित करण्याची संधी काही विकासकांनी उपलब्ध करून दिल्याने पनवेलच्या ग्रामीण भागांतही घर घेण्याचा प्रयत्न मुंबईकर चाकरमनी करत आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत वाशीत २७९८, कोपरखैरणे, २६७८, पनवेलमधील ४८७०, बेलापूर येथील २५८९ आणि उरणमधील ६५५ अशी १३ हजार ५९० घरांची विक्री झाल्याचे तेथील सह निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

ही वाढ गेल्या वर्षी पेक्षा आठ टक्के जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. उरण भागात फार मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत आहे. जेएनपीटी बंदराचा अतिरिक्त विस्तार आणि या बंदराला २२ मिनिटांत जोडणाऱ्या न्हावा शेवा सागरी मार्गाची चर्चा यामुळे या भागात जमीन व घरांची मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे. या संधीचा फायदा घेण्यास काही बोगस विकासकांनी सुरुवात केली आहे. वर्तमानपत्रांत आणि वाहिन्यांवर मोठ मोठय़ा आर्कषक जाहिरती देऊन हे बोगस विकासक ग्राहकांना लाखो रुपयांचा गंडा घालत असून तशा तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यांत वाढल्या आहेत. महारेराची नोंदणी बंधनकारक झाल्याने ही फसवणूक आटोक्यात आली असली तरी यापूर्वी या प्रलोभनांना बळी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

महामुंबई क्षेत्राचा विकास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. येथील पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. विमानतळ भूमिपूजनानंतर हा वेग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. उलवा व द्रोणागिरी क्षेत्राला जास्त महत्व आले आहे. गेल्या वर्षी एप्रिलपासून हा विक्री व खरेदीचा वेग दहा ते बारा टक्के वाढला असून गेल्या तीन महिन्यांत त्यात चांगली वाढ झाली आहे. विकासकांसाठी आणि ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब आहे.

– हरीष छेडा, अध्यक्ष, बिल्डर असोशिएशन ऑफ नवी मुंबई