News Flash

पनवेल गृहघोटाळ्यातील जमिनींवरील व्यवहार थांबवा

महेंद्रने शेतजमिनींच्या खरेदीत ग्राहकांचे पैसे गुंतवल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांचे महसूल विभागाला आदेश

पनवेल गृहघोटाळ्यातील विकासक महेंद्र सिंग याच्या ताब्यातील जागांचे व्यवहार थांबविण्याचे आदेश पोलीस विभागाने महसूल विभागाला दिले आहेत.

महेंद्रने शेतजमिनींच्या खरेदीत ग्राहकांचे पैसे गुंतवल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. शेतजमिनींवर इमारती बांधकामाचे मोठे फलक लावून स्वस्त घरे देण्याचे आमिष दाखवून हा फसवणुकीचा धंदा केल्याचे उजेडात आले आहे.  सध्या या प्रकरणाचा तपास नवी मुंबईचे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महेंद्रचे आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जवळचे संबंध होते, हेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. १६ दिवसांपूर्वी महेंद्र सिंग हा खांदेश्वर पोलिसांना शरण आला. येथील पोलिसांच्या कारवाईतील संथगतीमुळे आणि गृह व नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. महेंद्रने पोलीस कोठडीचे १४ दिवस संपल्यावर जामिनासाठी अर्ज केला होता; परंतु न्यायालयाने तो फेटाळला आहे.

  • आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सध्या पनवेल तालुक्यातील विहिघर गावातील दोन एकर जमिनीचे व्यवहार करू नयेत यासाठी पनवेलच्या महसूल विभागाला लेखी कळविले आहे.
  • विहिघर येथील जमीनमालकाला महेंद्रने दीड कोटी रुपये देऊन वचनचिठ्ठी बनवून त्या जागेवर कंपनीचा फलक रोवला लावला होता.

खांदेश्वर पोलीस ठाण्यातील इतर सदनिकांच्या व्यवहारातील फसवणुकीची बडी प्रकरणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यास या सर्व विकासकांचे पितळ उघडे पडेल, असे नवी मुंबई अ‍ॅक्शन फोरमचे अभिजित पाटील म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 2:34 am

Web Title: home scam in panvel
टॅग : Panvel
Next Stories
1 बेकायदा प्रार्थनास्थळांवरील कारवाई ठप्प
2 उरण-पनवेल, बंदर परिसरातील रस्त्यांवर यमदूत
3 परवडणाऱ्या घरांची परवड
Just Now!
X