उरणच्या राष्ट्रीय महामार्ग ४ ब ते खोपटादरम्यान नवीन मार्ग

उरणच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब ते द्रोणागिरी नोड हा आठ किलोमीटर लांबीचा रस्ता खारफुटी आड आल्याने गेली पाच वर्षे रखडला आहे. मार्गातील खारफुटी हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने मार्गाच्या कामाला गती येईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होईल, तसेच ४ ब ते खोपटादरम्यान नवीन मार्ग सुरू होणार असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली. या मार्गामुळे द्रोणागिरी नोडच्या वसाहतीतील अंतरही कमी होणार आहे.

सिडकोने २००९ पासून पागोटे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब ते करंजा असा ८.३ किलोमीटरचा कोस्टल मार्ग तयार करण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी यामार्गात खारफुटी नव्हती मात्र २०१३ पर्यंत रस्त्याचे काम सुरू असताना या परिसरातील खाडीमुळे खारफुटी उगवली. त्यामुळे रस्त्याच्या मार्गातील काही पूल बनविण्यात अडथळा निर्माण झाला होता. खारफुटीचा मार्ग मोकळा करण्यासाठी सिडकोने न्यायालयात दाद मागितली होती. सिडकोच्या या याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने खारफुटीची दुसऱ्या जागी लागवड करून रस्त्याचे काम पूर्ण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ८.३ किलोमीटर रस्त्यापैकी किमान पाच किलोमीटरचा द्रोणागिरी नोडपर्यंतचा रस्ता तयार होणार असल्याची माहिती सिडकोच्या रस्ते विभागाचे अधीक्षक अभियंता के. एम. गोडबोले यांनी दिली. तसेच या रस्त्याच्या कामामुळे द्रोणागिरी नोड मधील तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ बवरील पागोटे मार्गे खोपटा व द्रोणागिरी मार्गे जाणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

अंतर कमी होणार

८.३ किलोमीटर मार्गात २.६ किलोमीटरच्या अंतरात खासगी जमीन येत असल्याने ती संपादित झाल्यानंतर पुढील रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. मात्र पाच वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याने उरण पूर्व विभागातील प्रवाशांचाही ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’ (जेएनपीटी) ते खोपटामधील अंतर कमी होण्यास मदत होणार असल्याने या परिसरातील प्रवाशांनीही आनंद व्यक्त केला असून सरकारने तातडीने काम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.