नऊ दिवसात ५८ हॉटेलमालकांकडून अग्निशमना यंत्रणा कार्यन्वित करण्यासाठी अर्ज

पनवेल पालिका प्रशासनाने कारवाईचे हत्यार उगारल्यानंतर पालिका क्षेत्रातील हॉटेल व बारमालकांनी अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पालिकेत धाव घेतली आहे. पनवेल शहरातील एका बारला सील ठोकल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालिका क्षेत्रातील अजूनही अनेक बार आयुक्तांच्या रडारवर आहेत. कारवाईच्या या बडग्यामुळे अनेक वर्षे अडगळीत असणाऱ्या पालिकेच्या अग्निशमन विभागाला परवानगीसाठी हॉटेलमालकांची रांग लागली आहे. नऊ दिवसांत ५८ जणांनी पालिकेकडे अग्निशमण यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी अर्ज केले आहेत.

पनवेल पालिका क्षेत्रामध्ये सुमारे सव्वादोनशेहून अधिक हॉटेल, बार व फास्ट फूडचे सेंटर आहेत. परंतु यापैकी अनेक आस्थापनांनी आपल्या नोंदी पालिकेकडे केलेल्या नाहीत. मुंबई येथे मागील महिन्यात लागलेल्या अग्नितांडवानंतर पालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेलमधील हॉटेलमालकांना अग्निशमन यंत्रणेविना हॉटेल व्यवसाय न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सुरुवातीला आयुक्तांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आयुक्तांनी पनवेल शहरातील महाराजा लेडीज सव्‍‌र्हिस बारला सील ठोकल्यानंतर हॉटेल व बार रेस्टॉरन्टच्या मालकांच्या संघटनेने नमते घेतले. पनवेल शहरामधील हॉटेलमालकांनी आयुक्तांनी अग्निशमन यंत्रणेचा हट्ट सोडावा यासाठी भाजपचे सभागृह नेते परेश ठाकूर व नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यामार्फत आयुक्तांची भेट घेतली होती.

तरीही हॉटेलमालकांना दाद मिळाली नाही. सध्या पालिकेमधील अग्निशमन यंत्रणेमध्ये अर्ज करणाऱ्या हॉटेलमालकांची संख्या मोठी आहे. काही हॉटेलमालकांनी  आयुक्तांच्या आदेशाला फाटा देत हॉटेल विना परवाना सुरू ठेवली आहेत. कामोठे वसाहतीमधील सेक्टर १७ येथील गुप्ता आईस्क्रीम आणि पाणी पुरी सेंटरला सोमवारी दुपारी आग लागल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे.

अटी-शर्तीची पुर्तता केल्यानंतरच परवाना

पनवेल पालिकेच्या अग्मिशमन यंत्रणेने हॉटेल मालकांना १९ अटींची पूर्तता केल्यानंतरच अर्ज भरण्याचे सुचविले आहे. या १९ अटींमध्ये व्यवसायाचे ठिकाण, व्यवसायाचे स्वरूप, किती क्षेत्रफळ जागेवर व्यवसाय चालतो, जागेचा नकाशा, इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र, खरेदीखत, गुमास्ता परवाना, अन्न व औषण प्रशासनाचा परवाना, मद्य ठेवण्याचा परवाना, गॅस सिलेंडरची माहिती, गृहनिर्माण सोसायटीमध्ये बार असल्यास त्यांची परवानगी, हॉटेलमधील अंतर्गत वीजव्यवस्था सुरळीत असल्याचे वीज निरीक्षकांची पत्र, सिडको मंडळाची ना हरकत असल्यास त्याची प्रत, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती अशा विविध अटींची पूर्तता केल्यानंतरच हॉटेलमालकांना पालिकेचा अग्निशमन दलाच्या सुरक्षेचा परवाना मिळणार आहे. अनेक हॉटेलचालकांनी बांधकामांबद्दल नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अशा आस्थापनांना बांधकामे तोडून नियमित करावी लागणार आहेत.