झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क

नवी मुंबई : गेले काही दिवस नवी मुंबईत डेंग्यू संशयित रुग्णामध्ये वाढ होत असल्याने शहराला झिका विषाणूचा संसर्ग पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले असून शहरांतील डासउत्पत्ती केंद्रे नष्ट करण्याबरोबर घरोघरी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यात पुरंदरमध्ये झिका विषाणूची लागण झालेला राज्यातील पहिला रुग्ण आढळला असून त्या पार्श्वभूमीवर पूर्व खबरदारी घेण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची विशेष बैठक घेत झिकासह मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळी कालावधीत होणाऱ्या कीटकजन्य व साथरोगांच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

झिका विषाणू हा एडिस डासांमार्फत पसरतो व त्याची लक्षणे साधारणत: डेंग्यू आजाराप्रमाणे असतात. ताप, अंगावर पुरळ उठणे, अंगदुखी, सांधेदुखी ही झिका विषाणूची सर्वसाधारण लक्षणे आहेत.  गरोदर महिलांना हा आजार झाल्यास होणाऱ्या बाळाच्या डोक्याचा घेर कमी असण्यासारखे दोष उद्भवू शकतात. त्यामुळे याविषयी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने आयुक्तांनी झिका, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरासीस आजार होऊच नये याकरिता प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून घरोघरी केले जाणारे ताप सर्वेक्षण तसेच डासउत्पत्ती स्थाने सर्वेक्षण अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. एखाद्या ठिकाणी डास झाले असल्याची तक्रार प्राप्त होताच त्याची दखल घेत त्या ठिकाणी फवारणी करावी.