वहाळ ग्रामस्थांची शौचालयाची सिडकोने मोठी अडचण करून ठेवली आहे. उलवा नोडमधील सेक्टर ३ मध्ये सिडकोने तीन वर्षांपूर्वी २५ लाख रुपये खर्चून सार्वजनिक शौचालय बांधले होते. ते शुक्रवारी पाडण्यात आले. शौचालय पाडून तयार झालेली मोकळी जागा आता विकासकाला गृहप्रकल्पाला दिली जाणार आहे. वहाळ ग्रामस्थांसाठी बांधलेले हे शौचायल गृहप्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर येत होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सिडकोकडे शौचालयाचे नियोजनच नव्हते तर लाखो रुपये खर्चून ते बांधलेच कशाला; याउलट ते आता पाडून ग्रामस्थांच्या प्रात:विधीची सोय कोण आणि कधी करणार, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना सिडकोने एनआरआय पोलीस ठाण्यात नेले.

सरकार एकीकडे घरटी शौचालय बांधण्यासाठी अनुदान देत असताना नवी मुंबईतील उलवा नोडमध्ये शौचालय पाडून ग्रामस्थांची गैरसोय केली आहे. वहाळ आणि मोरावे ग्रामस्थांची या शौचालयामुळे सोय होत होती. हे शौचालय सिडकोने बांधले असलेतरीही या शौचालयाची देखभाल वहाळ ग्रामपंचायतीच्या निधीतून केली जाते. वहाळ गावच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी या शौचालयाच्या पाडकामाला विरोध केल्यानंतर हे प्रकरण सिडको अधिकाऱ्यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मात्र तोपर्यंत ज्या जागेवर हे सार्वजनिक शौचालय उभे आहे ती जागा सिडकोनेच दिल्याचे विकासकाने कागदपत्रे दाखविल्याने सिडकोचा भोंगळ कारभार उजेडात आला. ग्रामस्थांनी हे शौचालय जमीनदोस्त करण्यापूर्वी विकासकाने व सिडको प्रशासनाने ग्रामस्थांसाठी इतर शौचालये बांधून देणे गरजेचे होते अशी मागणी केली. सध्या उलवा गावातील ग्रामस्थांचा शुक्रवारपासून प्रात:र्विधी करायचा कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.