२७ हजारांहून अधिक घरे विक्रीविना पडून; २० ते ३० टक्के सवलतीचा अंदाज

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : मागील अनेक वर्षांत महामुंबई क्षेत्रातील विकासकांनी वाढवलेले घरांचे कृत्रिम दर करोना काळात कमी होण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. नवी मुंबई, पनवेल आणि उरण  भागांतील २७ हजारांहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे तयार घरे आणि भविष्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये २० ते ३० टक्के सवलत मिळू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बांधकाम क्षेत्रात याला ‘कोविड डिल’ म्हणून ओळखले जात आहे.

सिडकोने महामुंबई क्षेत्रात दोन लाख घरे बांधण्याचा संकल्प सोडला आहे. १५ हजार घरातील काही घरांची वाटप प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सिडको आणि प्रकल्पग्रस्तांकडून भूखंड घेऊन गृहसंकुल बांधणाऱ्या विकासकांची संख्याही या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात आहे. नैना क्षेत्रात शेतकऱ्यांची जमीन घेऊन गृहसंकुले उभारली जात आहेत. या क्षेत्रात करोनापूर्वी २००च्या वर विकासक छोटी-मोठी बांधकामे करीत होते. पंतप्रधान आवास योजनेसाठी घरे बांधणाऱ्या विकासकांची संख्याही या भागात जास्त आहे. त्यामुळे पनवेल ग्रामीण भागात कोन, जांभुळपाडा, या भागात वाढीव चटई निर्देशांक वापरून अनेक विकासकांनी टोलेजंग इमारती बांधलेल्या आहेत.

महामुंबई क्षेत्रात २७ हजारापेक्षा जास्त घरे बांधून विक्रीविना पडून असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. खासगी विकासकांच्या कृत्रिम दरवाढीला रोखणारी महागृहनिर्मिती करून सिडकोनेही घरे बांधण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे मागणी कमी आणि पुरवठा जास्त असे चित्र निर्माण झाले आहे. महामुंबई क्षेत्रात एकाचवेळी घरांचा साठा वाढला असून विकासक नोटाबंदी, जीएसटी, महारेरा आणि नंतरची आर्थिक मंदीचा सामना करीत बांधकाम क्षेत्राचा डोलारा सांभाळत असताना अचानक करोना साथ रोगाचे संकटाने गाठले आहे.  गेली तीन वर्षे या कृत्रिम संकटांना सामोरे जाणारी बांधकाम उद्योग पुन्हा उभारी घेत होता असे विकासक देवांग त्रिवेदी यांनी स्पष्ट केले.

करोना संकटामुळे उभे राहणाऱ्या या विकासकांचे कंबरडे मोडले आहे. यानंतरचा काळ पाहता त्यांनी बांधकामातील हिस्सा देऊन अंग काढून घेतले असल्याचे विकासक हरिश छेडा यांनी सांगितले. शिल्लक राहिलेली घरे कमी किमतीत मिळण्याची यामुळे आशा निर्माण झाली आहे.

१७ टक्के  विकासक या व्यवसायातून माघार घेणार असल्याचे समजते. मागील पाच वर्षांत एकाच वेळी वाढलेले बांधकाम, सिडकोची महागृहनिर्मिती आणि करोनाचे संकट यामुळे शोध घेतल्यास या क्षेत्रात स्वस्त आणि प्रशस्त घरे मिळू शकतील असा विश्वास मालमत्ता सल्लागार योगेश झवर यांनी व्यक्त केला आहे.

दुकानेही स्वस्त?

घरांचे प्रति चौरस फूट दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यापारी संकुलांना आता मोक्याच्या जागांची संधी उपलब्ध झाली आहे. अनेक दुकाने खाली झाली असून ती कमी दरात भाडय़ाने मिळत आहेत. त्याचा फायदा नवीन उद्योग करण्यासाठी होण्याची शक्यता आहे.