21 September 2020

News Flash

आवास योजनेला अखेर मंजुरी

सिडकोने तातडीने  हालचाली करून करोना संसर्ग काळात या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी मिळवून आणली.

खांदेश्वर स्थानकाशेजारील जागेवर उभारणी; पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडून हिरवा कंदील

पनवेल : खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील सिडको उभारत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील महागृहनिर्माण प्रकल्पाला राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने अखेर मंजुरी दिली. नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे रखडलेल्या या प्रकल्पातील बांधकामातील अडचणी दूर झाल्या आहेत. मार्च महिन्यात महागृहनिर्माण प्रकल्प होत असलेल्या ठिकाणी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे यांनी भेट देऊन रहिवाशांची बैठक घेतली होती. त्यात प्रकल्प लोकहिताचा नसल्यास प्रकल्पाला विरोध करू, असे जाहीर केले होते.

सिडकोने तातडीने  हालचाली करून करोना संसर्ग काळात या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी मिळवून आणली. त्यामुळे या प्रकल्पपूर्तीसाठी सिडको ठाम आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्प उभारणीसाठी रेल्वे स्थानकाशेजारी जागा का निवडली, पर्यावरण विभागाची मंजुरी, वाहनतळाचे आरक्षण एका रात्रीत कसे उठवले, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला होता.

सिडकोने नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या वाहनतळांवर महागृहनिर्माण प्रकल्प बांधण्याचे धोरण हाती घेतल्यानंतर त्याचे कंत्राट वाटप करण्यात आले. राज्यात भाजपची सत्ता असताना ही योजना अमलात आणण्यात आली. महागृहनिर्माण प्रकल्पांना विविध परवानग्या मिळण्याआधी कंत्राटांचे वाटप करण्यात आले. कंत्राटदारांना आगाऊ  रक्कम देण्यात आली. कंत्राटदारांनी बांधकाम हाती घेतल्यानंतर प्रकल्पाशेजारील  रहिवाशांनी प्रकल्पाला विरोध केला. स्थानकाशेजारी प्रकल्प उभारल्यास पायाभूत सुविधांवर ताण येईल. नवी मुंबईला बकाल स्वरूप येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.

विरोधाचा सूर

वाहनतळाचे आरक्षण कसे बदलण्यात आले, असा सवाल  उपस्थित करीत पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासह काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला होता. प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन विरोध दर्शविला. एकीकडे नागरिकांना हा प्रकल्प योग्य असल्याची भूमिका सिडको मंडळाने घेतली. तर दूसरीकडे प्रकल्पाच्या मंजुरीची कागदपत्रे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सिडकोच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. मात्र, नागरिकांच्या विरोधानंतर आमदार ठाकूर यांनीही विरोधाचा सूर आळवला. रायगडचे खासदार, पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्या विरोधानंतरही महागृहनिर्माण प्रकल्प होणार असल्याने सामान्य नागरिकांनी राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 1:45 am

Web Title: housing scheme near khandeshwar station finally approved zws 70
Next Stories
1 सिडको घरांसाठी दीड हजार पोलीस इच्छुक
2 नवी मुंबईत १५ दिवसांत १२ ‘फोटो स्टुडिओ’ बंद
3 २५१ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे
Just Now!
X