अघोरी एक कहाणी..
पत्नी व तिच्या प्रियकराचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला सागरी सुरक्षा अधिकारी धृवकांत ठाकूर याने पोलिसांना विनंती करुन पत्नीचा अंत्यविधी स्वहस्ते केला. ही परवानगी द्यावी का, यासाठी पोलिसांनी धृवकांतची पत्नी सुश्मिताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर सुश्मिताच्या पालकांनी फॅक्सद्वारे संमतीपत्र धाडल्यानंतर पोलिसांनी धृवकांतला ही मुभा दिली. तिच्या पालकांनी मात्र अंत्यविधीला येणे टाळले. सुश्मिताच्या अंत्यविधीवेळी धृवकांतला पोलीस बंदोबस्तामध्ये कामोठे येथील स्मशानभूमीत नेण्यात आले. सुश्मितावर अग्निसंस्कार झाल्यानंतर धृवकांतला अश्रू अनावर झाले.
कामोठे वसाहतीमध्ये आठ डिसेंबरला झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली होती. सेक्टर १९ येथील वेदांत दृष्टी या इमारतीमधील २०१ क्रमांकाच्या सदनिकेमध्ये धृवकांतने सुश्मिता व तिच्या प्रियकराची हत्या केली. धृवकांत व सुश्मिताचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र अलीकडे त्यांच्यात भांडणे होत होती. या बेबनावामुळे त्यांनी दोन महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ही घटना घडली त्या रात्री सुश्मिता व तिचा प्रियकर अजयला आपल्या घरात पाहून धृवकांतचा संताप अनावर झाला. त्यावेळी या दोघांनी मोठे हार आणले होते व आपण लग्न करत आहोत, असे त्यांनी धृवकांतला सांगितले. आम्ही परस्परांना हार घालताना तसेच अजय मला कुंकू लावताना तू छायाचित्र काढ, असे सुश्मिताने सांगितल्याने धृवकांतने तिच्या प्रेमाखातर तसे केले. मात्र त्यानंतर अजयने आपल्या मोबाइलमधील त्या दोघांची अश्लील छायाचित्रे दाखवल्यानंतर धृवकांतचा संताप अनावर झाला. रात्री संधी साधून त्याने प्रथम अजयचा गळा चिरून खून केला. सुश्मिताला फार वेदना होऊ नयेत, यासाठी त्याने तिच्या तोंडावर उशी दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही ती जिवंत राहिल्याने त्याने गळा दाबून तिला संपवले. यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
सुश्मिताला मारत असताना आपल्या मनाला खूप वेदना झाल्या, मी तिच्यावर जिवापाड प्रेम करीत होता, मला तिला ठार मारायचे नव्हते, मात्र तिने फसवणूक केल्याने माझा तोल सुटला, असे धृवकांतने पोलिसांना सांगितले.