कारवाईनंतर दोन महिन्यांत परिस्थिती ‘जैसे थे’

कोपरखैरणे रेल्वे स्थनाकाबाहेर सिडकोच्या भूखंडावर वसलेल्या अनधिकृत झोपडय़ांवर सिडको वारंवार कारवाई करत असूनही, त्या पुन्हा बांधल्या जात आहेत. कायमस्वरूपी तोडगा काढण्यात सिडको फोल ठरली आहे.

दोन महिन्यांपूर्वी येथील अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली होती. त्यादरम्यान झोपडपट्टीवासीयांनी विरोध दर्शवत पोलिसांवर जोरदार दगडफेक केली होती. या दरम्यान एक पोलीस निरीक्षकदेखील जखमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा या भागात झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत.

मागील कारवाईच्या वेळी झालेल्या हल्ल्यानंतर येथे सुरक्षा भिंत उभारण्यात येईल, एक सुरक्षारक्षक तैनात करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, मात्र दोन महिने उलटूनही अंमलबाजवणी झाली नाही. त्यामुळे झोपडपट्टीधारकांनी पुन्हा झोपडय़ा उभारल्या आहेत.