उच्च न्यायालयाच्या र्निबधांचे उल्लंघन करणाऱ्या येथील २० मंडळांवर कारवाईची टांगती तलवार असताना धुमधडाक्यात नवरात्रोत्सव साजरा करू पाहणाऱ्या मंडळांवरही कारवाईची शक्यता आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या १४ आणि रस्ता अडवून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ६ मंडळांवर पोलिसांनी कारवाई केल्याने आता आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवातही हे कारवाई सत्र सुरू राहील का, या भीतीच्या सावटाखाली नवरात्रोत्सव मंडळातील कार्यकर्ते आहेत.
तालुक्यामध्ये हजार ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्यापैकी १७७ ठिकाणी धूमधडाक्यात दांडिया खेळला जातो. या गरब्यादरम्यान अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत डीजे लावून कर्णकर्कश आवाजात धांगडधिंगा घातला जातो. अनेक मंडळे रात्री दहानंतर दांडिया आवरता घेत असली तरी हे र्निबध न पाळणाऱ्या मंडळांची संख्याही मोठी आहे.
यंदा उच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवांबाबत नियम घालून दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. या उत्सवांचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत तीन बैठका घेतल्या. पोलिसांच्या या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसून आले. अनेक गणेश मंडळांनी सकारात्मक भूमिका घेत आजवरच्या परंपरेला फाटा देत हा उत्सव साजरा केला. दुसरीकडे न्यायालयाचे र्निबध मोडणाऱ्या एकूण २० मंडळांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने ही मंडळे पुढच्या वर्षी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतील, अशी अपेक्षा आहे.
या पाश्र्वभूमीवर नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनीही कायदा पाळावा, असे आवाहन पोलीस करीत आहेत.