नेरुळ-खारकोपर मार्गावरील स्थानकांत एकही पोलीस ठाणे नाही; रेल्वे पोलीस आयुक्तालयाकडे प्रस्तावच नाही

बहुप्रतीक्षीत नेरुळ-खारकोपर लोकल सेवा सुरू होऊन सात महिने झाले. प्रवाशांचाही या सेवेला वाढता प्रतिसाद आहे, मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर अद्यापपर्यंत एकही पोलीस ठाणे झालेले नाही. विशेष म्हणजे याबाबत रेल्वे पोलिसांना अद्याप कसलाही प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडून दिलेला नाही.

या मार्गावर सध्या तीन रेल्वे स्थानके पूर्ण झाली असली तरी दोनच ठिकाणी रेल्वे थांबा आहे.

नवी मुंबईच्या विस्तारीकरणाच्या दृष्टीने नेरुळ-उरण लोकल हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या मार्गाचे काम वेगात सुरू असून तरघर, बामणडोंगरी व खारकोपर ही स्थानके बांधून तयार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात नेरुळ खारकोपर ही सेवा सात महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. तरघर रेल्वे स्थानकाचे काही काम अपूर्ण असल्याने या ठिकाणी लोकल थांबत नाही. बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकावर सध्या थांबा आहे. पहिल्या दिवसापासूनच या लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अद्यापपर्यंत एकही पोलीस ठाणे या स्थानकांवर नाही किंवा तसा प्रस्तावही पोलीस विभागाकडे आलेला नाही.

सध्या खारकोपर रेल्वे कक्षेत गुन्हा वा अपघात घडला तर न्हावा-शेवा पोलीस ठाणे व सीवूड ते बामणडोंगरी दरम्यान अपघात वा गुन्हा घडला तर एनआरआय पोलीस ठाणे गाठावे लागते. तसेच बंदोबस्तही द्यावा लागत आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यात अगोदरच मनुष्यबळ कमी असताना त्यांना रेल्वेचा अतिरिक्त भार आहे. सुदैवाने आतापर्यंत एकही गंभीर गुन्हा समोर आला नाही. मात्र अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या स्थानकांवर पोलीस ठाण्यांची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

या बाबत सिडको अधिकाऱ्यांनी आम्ही फक्त पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो. मात्र तसा प्रस्ताव अद्याप तरी आलेला नाही असे सांगितले. या शिवाय याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुनील उदासी यांच्याशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. उदासी यांनी मी व्यस्त आहे, तुम्ही जैन यांच्याशी संपर्क करा असा संदेश पाठवला. तर जैन यांनी फोनच उचलला नाही.

सध्या चार ठिकाणी थांबा

उरण नेरुळ लोकल मार्गावर नेरुळ, सीवूड, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वे स्थानके आहेत. त्यापैकी नेरुळ, सीवूड, बामणडोंगरी, खारकोपर या स्थानकांवर थांबा आहे. तरघरचे काम अपूर्ण आहे. काही दिवसात येथेही लोकल थांबेल तर इतर स्थानके खारकोपर उरण दुसऱ्या टप्प्यात सुरू होणार आहेत.

या लोकल सेवेमुळे गैरसोय दूर झाली आहे. मात्र कधी कधी रिकामे रेल्वे स्थानक असताना भीती वाटते. कधी एकदा लोकल येते आणि त्यात बसते असे होते. निदान पोलीस ठाणे असले किंवा पोलीस पाहिले की सुरक्षित वाटते. त्यामुळे येथे रेल्वेचे पोलीस ठाणे असणे गरजेचे आहे.

मालती म्हात्रे, प्रवासी, खारकोपर

या नव्या मार्गावरील रेल्वे स्थानकांबाबत अद्याप सिडको वा रेल्वे प्रशासनाकडून प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास शक्य तेवढय़ा लवकर पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाईल.

-सुधीर नवके, साहाय्यक आयुक्त, रेल्वे पोलीस

अगदीच विरळ प्रवासी असल्याने पोलिसांची आवश्यकता आहे. साखळी चोरास सहज पळून जाणे शक्य आहे. महिलांसह सर्वच प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे.

-सेजल अय्यंगार, प्रवासी, बामणडोंगरी