19 April 2019

News Flash

शहरातील दिवाबत्तीकडे दुर्लक्ष

परिमंडळ एक वाशी ते बेलापूर विभागातील सिडकोकालीन पथदिव्यांचे गंजलेले खांब बदलण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

(संग्रहित छायाचित्र)

रहिवासी असुरक्षित असल्याचा स्थायी समितीत आरोप

नवी मुंबईत ठिकठिकाणी पथदिवे, दिवाबत्ती, विजेचे खांब यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यांवर अंधार पडत असून गुन्हेगारांना मोकळे रान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाबत्तीचे सर्वेक्षण आणि दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी स्थायी समिती सदस्यांनी केली. परिमंडळ एक वाशी ते बेलापूर विभागातील सिडकोकालीन पथदिव्यांचे गंजलेले खांब बदलण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या वेळी इतर प्रभागांतील दिवाबत्ती, खांब यांची पाहणी करून संपूर्ण शहरातच दिवाबत्तीची सोय उपलब्ध करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली.

सिडको काळातील २५ वर्षांपूर्वीचे जुने, गंजलेले पथदिव्यांचे खांब बदलण्यासाठी १ कोटी ७५ लाख ३३ हजार ३६२ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या वेळी प्रशासनाने परिमंडळ १ मधील दिवाबत्ती बदलण्याचा प्रस्ताव आणला. परिमंडळ दोनमधील गैरसोयींचे काय, तेथील दिवाबत्ती कधी सुरळीत होणार असा सवाल नगरसेवकांनी केला. पावणे गावात निम्मे दिवे बंद आहेत. त्याला लागूनच औद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे रात्री नोकरदारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणी घ्यावी, असा सवाल नगरसेविका मनीषा भोईर यांनी केला.

काही नगरसेवकांनी केवळ सिडकोकालीन खांब गृहीत न धरता संपूर्ण शहरातील दिवाबत्ती खांब, दिवे यांची पाहणी करून त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली. कोपरखैरणे विभागात सार्वजनिक शौचालये, पाण्याच्या पंपाचे दोन महिन्याचे वीज बिल पालिकेने थकविले आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे का, नियोजनाबरोबर काटेकोरपणे अंमलबाजवणी होते की नाही याची शहानिशा करावी, असे मत नगरसेवक देविदास हांडे पाटील यांनी व्यक्त केले. यावर स्थायी समिती सभापतींनी संपूर्ण शहरातील दिवे, खांब यांची पाहणी करून त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव आणावेत असे प्रशासनाला सुचवले. यावर अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांनी नियोजनात राहिलेल्या त्रुटी विचारात घेतल्या जातील, तसेच  परिमंडळ २चा देखील प्रस्ताव सादर करू असे आश्वासन दिले.

आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता

स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या सभेत नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत आणि नागरी आरोग्य केंद्रांत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणले. पालिका रुग्णालयांत नवीन उपकरणे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

पालिका रुग्णालयात उपकरणे  खरेदी करण्यासाठी ७२ लाख ३४ हजार ५८० रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबरोबर आरोग्य विभागातील इतर अपुऱ्या सोयी सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. ऐरोलीत सुसज्ज माताबाल रुग्णालय उपलब्ध करून देण्यात पालिका फोल ठरत असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले.

इलटण पाडा विभागात पाच प्रभागांसाठी एकच नागरी आरोग्य केंद्र आहे. येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी संख्या जैसे थेच आहे. प्रभागातील ६ हजार नागरिकांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी केवळ एका महिला कर्मचाऱ्यावर सोपविण्यात येत आहे.

कर्मचारी कमी असल्याने उपलब्ध सुविधा नागरिकांपर्यंत पोहचविण्यात अडचणी येतात, अशी टीका करण्यात आली. त्यावर आरोग्य अधिकारी दयानंद कटके यांनी आरोग्य विभागात कर्मचारी संख्या कमी असल्याचे मान्य करत पुढील काळात ही समस्या मार्गी लावण्यात येईल अशी माहिती दिली.

वाशीत सर्वाधिक धोकादायक खांब

या प्रस्तावात परिमंडळ एकमधील एकूण ७९८ पथदिव्यांचे खांब बदलण्याचे नमूद केले आहे. यामध्ये वाशी विभागात सर्वाधिक खांब बदलण्यात येणार आहे. वाशी मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्थानक परिसर, अरेंजा कॉर्नर, वाशी शिवाजी चौक या ठिकाणचे ३२४ खांब बदलण्यात येणार आहेत. त्यांनतर पारसिक हिल येथील १३७ खांब बदलले जाणार आहेत.

First Published on August 31, 2018 3:06 am

Web Title: ignore the light of the city