नवी मुंबई पालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी विभागाने एपीएमसी बाजारातील ‘मॅफको’ मार्केटमधील अतिधोकायक इमारतींमध्ये झालेल्या ५५ बेकायदा बांधकामांकडे अनेक वेळा तक्रार देऊनही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ही अतिधोकादायक इमारत जाहीर केल्याने व्यापाऱ्यांनी केलेल्या बेकायदा बांधकामांमुळे दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईत ठिकठिकाणी शेतमालाची किरकोळ व घाऊक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना राज्य शासनाने ‘मॅफ्को’ कंपनीच्या माध्यमातून ओटले, गाळे दिलेले आहेत. गेली ५० वर्षांत मॅफ्कोने बांधलेली इमारत जर्जर झाली असून नवी मुंबई पालिकेने या सर्व व्यापारी संकुलाला अतिधोकादायक घोषित केले आहे. तीनशेपेक्षा जास्त असलेल्या या व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी सिडकोबरोबर संघर्ष सुरू आहे. त्यामुळे येथील व्यापारी या इमारतींचा ताबा सोडत नाहीत. अशा स्थितीत या व्यापारी संकुलात मोठय़ा प्रमाणात दुरुस्ती व रंगरंगोटीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामे व पोटमाळे काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे अगोदरच अतिधोकादायक असलेल्या या इमारती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आलेल्या आहेत. याची तक्रार येथील एक व्यापारी शशिकांत रामचंद्र शिंगोटे यांनी नवी मुंबई पालिकेचे आयुक्त व अनधिकृत बांधकाम विभागाला पाच वेळा केली आहे. २० एप्रिल रोजी केलेल्या या तक्रारीची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. अनधिकृत बांधकामविरोधी विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगिरे व तुर्भे विभागाचे साहाय्यक आयुक्त अंगाई साळुंखे यांनी २१ मे रोजी या व्यापारी संकुलाची पाहणी केली पण ही पाहणी केवळ नावापुरती झाली आहे. त्यानंतर या येथील व्यापाऱ्यांच्या संस्थेने कार्यालयावर टाकलेले पावसाळी शेड काढण्याची तत्परता या विभागाने दाखविली.

अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्याचा या विभागाचा परिपाठ शहरी, ग्रामीण भागासारखाच कायम आहे. नवी मुंबईतील अनेक गावांत प्रकल्पग्रस्त फिफ्टी फिफ्टीच्या नावाखाली आजही बांधकामे करीत आहे. त्यासाठी पालिका, सिडको आणि स्थानिक पोलीस ठाण्यांना या भूमाफियांकडून रसद पुरविली जात आहे.

कोपरखैरणेसारख्या शहरी भागात तर आयुक्तांच्या समोरच बेकायदेशीर बांधकामांचे इमले उभे राहत आहेत. ज्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या विभागात बेकायदा बांधकाम आढळून येईल त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांचे आश्वासन हवेत विरून गेलेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या संधीचे सोने करून कोपरखैरणे भागात ही बेकायदेशीर बांधकामे वाढली असून त्याचा जनजीवनावर विपरीत परिणाम झालेला आहे.

पालिका प्रशासन जबाबदार?

तुर्भे येथील एपीएमसी बाजारपेठ ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी व्यापाऱ्यांनीही मोठय़ा प्रमाणात गाळ्यांच्या वर बेकायदेशीर बांधकामे केलेली आहेत. मॅफ्कोसारख्या छोटय़ा व्यापारी संकुलात पोटमाळे काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी झाल्यास त्याला नवी मुंबई पालिका प्रशासन जबाबदार राहील असे शिंगोटे यांनी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.