नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील एक रंगाचा कारखाना रविवारी आगीत भस्मसात झाला तर एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. एमआयडीसीत आगीची ही पहिलीच घटना नाही. वारंवार अशा घटना घडत आहेत. मात्र तरीही येथील कारखान्यांचे अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.

या कारखान्यातही आगरोधक यंत्रणा, स्प्रिंग यंत्रणा नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तर किती कारखान्यांची आग प्रतिबंधक यंत्रणा आहेत व त्यांची तापसणी केली आहे का याची माहितीही एमआयडीसीकडे उपलब्ध नाही.

रविवारी सकाळी ८ च्या सुमारास तुर्भे एमआयडीसी भूखंड क्रमांक डी १२ येथील बालाजी कलर्स या केमिकल कंपनीला आग लागली. सुरुवातीला आग लहान होती. त्यामुळे एका सुरक्षारक्षकाने आणि अन्य एका कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना आग आटोक्यात आली नाही. आगीचा भडका उडाल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन पथक पाच बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र संध्याकाळपर्यंत आगीची धग सुरूच होती. यात कंपनीमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करणारे सत्यम प्रेमसिंग (वय ५२) यांचा भाजून मृत्यू झाला. सत्यम हे कंपनीत साफसफाई करीत होते. त्याच दरम्यान ज्वालाग्राही पदार्थ थिनेलला आग लागली. थिनेल हे पेट्रोलपेक्षाही अधिक ज्वलनशील आहे. काही क्षणातच आग सर्वत्र पसरली. काळा धूर मोठ्या प्रमाणात पसरला, त्यामुळे अग्निशमन दलास आग विझवताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यात साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असल्यानेही अडचणी येत होत्या.

आगीमुळे शेजारील बेकरी आणि अन्य रासायनिक कंपनीलाही धोका निर्माण झाला होता. तेथील काचेची तावदान उष्णतेने फुटत होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठीही अग्निशमनचे मुनष्यबळ वापरावे लागले. हा सर्व प्रकार झाला तो कंपनीत आगरोधक यंत्रणा नसल्यामुळे तसेच सामासिक अंतराचा वापर करण्यात न आल्याने. या ठिकाणी पेट्रोलपेक्षा ज्वालाग्राही पदार्थ वापरले जात असताना आगरोधक यंत्रणा, स्प्रिंग यंत्रणा नव्हती, अशी माहिती उपअग्निशमन अधिकारी डी. ई. सूर्यवंशी यांनी दिली. याबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अग्निसुरक्षा तपासणी नाही

चौकट : एमआयडीसीत सुमारे साडेपाच हजार छोट्या-मोठ्या कंपन्या असून लाखो लोक काम करीत आहेत. मात्र येथील कंपन्यांपैकी किती कंपन्यांची अग्निसुरक्षा तपासणी केली याबाबत ठोस उत्तर एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाकडे नाही. यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र कंपन्या आणि अग्निशमन दलही याकडे गांभीर्याने पाहात नाही. रविवारी एका कामगाराचा यात बळी गेला आहे.