खबरदारी म्हणून पालिकेचा पुढाकार

नवी मुंबई आम्रमार्गावरील उड्डाणपुलाबाबत सावधगिरीचा उपाय म्हणून ‘आयआयटी मुंबई’कडून या उड्डाणपुलाचे स्थापत्यविषयक (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मात्र डांबरीकरणाचा भाग काढून टाकण्यात आल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

नवी मुंबई पालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस हार्बर रेल्वे मार्गावरून हा आम्रमार्ग उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. त्यावर काही दिवसांपूर्वी पालिकेने डांबरीकरणाचे काम हाती घेतले होते. आता डांबरीकरणाचा भाग काढून टाकण्यात आला आहे.

उरण फाटय़ाकडून पालिका मुख्यालयाकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील या उड्डाणपुलाची पावसाळ्यात दुरवस्था झाली होती.

उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे या उड्डाणपुलापासून ते पालिका मुख्यालयासमोरील किल्ले गावठाण चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पालिकेने उड्डाणपुलावरील डांबरीकरणाचे काम हाती घेतले. या उड्डाणपुलावरील डांबरीकरणाचे थर काढण्यात आले आहेत. त्यामुळे पुलाच्या ‘विस्तारजन्य सांधे’ (एक्सपान्सेस जॉइंट) असलेल्या ठिकाणी लोखंडी पट्टय़ा रस्त्यावर दिसत आहेत. तर काही ठिकाणी लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे चित्र आहे. त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहनचालक जीव मुठीत घेऊन उड्डाणपूल ओलांडतात.

एकीकडे पालिकेने खबरदारी म्हणून ‘आयआयटी’कडून या पुलाचे स्थापत्यविषयक परीक्षण करण्यात येणार आहे. याबाबतचे पालिकेचे पत्रही आयआयटीला देण्यात आले असून यासाठीचे मूल्यही ठरविण्यात आले आहे. स्थापत्यविषयक परीक्षण पूर्ण झाल्यानंतर डांबरीकरणाचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी दिली.

याच उड्डाणपुलाचा एका दिशेचा कठडापण तुटला आहे. त्या ठिकाणी तात्पुरते बांबू लावण्यात आले आहेत. पालिका मुख्यालयासाठी याच आम्रमार्गावरील उड्डाणपुलावरून हजारो नागरिक, पालिका कर्मचारी तसेच हजारो कंटेनर जात असून या उड्डाणपुलावरील डांबरीकरणाचे काम करण्याची मागणी होत आहे.