आयआयटीचा पाहणी अहवाल महापालिकेने फेटाळला

वाशी सेक्टर २६ येथील २२५ इमारतींची तपासणी करून आयआयटीने जाहीर केलेल्या धोकादायक इमारती पालिकेला अमान्य आहेत. रहिवासी या इमारती दुरुस्त करून वापरू शकतात, असा अभिप्राय धोकादायक इमारती ठरविण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या पाच सदस्यांच्या समितीने दिला आहे. यामुळे या इमारतीत राहणारे सुमारे दोन हजार रहिवासी रविवारी आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत.

सिडकोने तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या काही इमारतींचे बांधकाम निकृष्ट आहे. त्यामुळे या घरांचे छत आणि प्लॅस्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने राज्य शासनाने गतवर्षी सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींना अडीच वाढीव एफएसआय देऊन पुनर्बाधणीची परवानगी दिली आहे. त्यामुळे नियोजन प्राधिकरण म्हणून पालिकेकडे २३ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यात वाशी सेक्टर २६ येथील आठ सोसायटय़ांच्या प्रस्तावांचा अंतर्भाव आहे. कोपरी गावामागे असलेल्या सुमारे २२५ इमारती सिडकोने बांधल्या असून त्या अत्यंत वाईट स्थितीत आहेत. त्यासाठी येथील रहिवाशांनी प्रत्येकी पाच हजार रुपये शुल्क काढून आयआयटीच्या पथकाकडून या इमारतींची तपासणी करून घेतली. आयआयटीच्या पथकाने या सर्व इमारतींचे प्लॅस्टर नुमने काढून घेतले आणि प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर या सर्व इमारती धोकादायक असून त्यांच्या पुनर्बाधणीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अडीच एफएसआयने पुनर्विकासाची परवानगी देण्यापूर्वी राज्य शासनाने स्थापन केलेल्या सार्वजनिक बांधकाम, कोकण विभागीय आयुक्त, पालिका आणि सिडको अधिकाऱ्यांच्या पाच जणांच्या पथकाने या इमारतींची पाहणी करून या इमारती धोकादायक नसून त्यांची डागडुजी करून त्या राहण्यास तयार करता येण्यासारख्या असल्याचा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे या इमारतींची पुनर्बाधणी आता शक्य नसल्याचे दिसून येत आहे. आयआयटीसारख्या प्रगत संस्था या इमारती धोकादायक असल्याचे ठरविते आणि शासनाची समिती त्या धोकायदाक नाहीत असे म्हणत असल्याने रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आयआयटीच्या पथकाने केलेली तपासणी ही पाहण्यासारखी होती. प्रत्येक इमारतीच्या भागाचे नमुने घेण्यात आले होते. त्यासाठी योग्य ती यंत्रसामग्री आणण्यात आली होती. याउलट शासनाची समितीचे सदस्य हातात एक वही घेऊन वाऱ्यासारखे आले आणि वाऱ्यावर निघून गेले. त्यांनी या इमारती धोकादायक नसल्याचे जाहीर केले आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रविवारी येथील रहिवासी एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत. त्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.

– विलास भोईर, स्थानिक नगरसेवक, प्रभाग क्रमांक ५७