नवी मुंबई : कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक चौकातील डीमार्ट समोरील रिक्षा थांबा वाहतूक कोंडीचे सर्वात महत्त्वाचे कारण ठरत आहे. गेली तीन ते चार वर्षे हा अनधिकृत रिक्षा थांबा सुरू आहे, मात्र त्याकडे वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने दुर्लक्ष केले आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे हा सर्वाधिक रहदारीचा मार्ग समाजाला जातो. या पट्टय़ात रहिवासी संकुले, बाजार, मिनी मार्केट, छोटी मोठी दुकाने आहेत. सकाळी व संध्याकाळी तिथे प्रचंड वाहतूककोंडी होते. या रस्त्यावर सार्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो ते रा. फ. नाईक चौकात.

वाशी कोपरखैरणे हा रस्ता रुंद असला तरी सेक्टर आठ ते पंधरा हा रस्ता मात्र अरुंद आहे. त्या पैकी एका टोकाला डी मार्ट स्टोअर असून या ठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. रिक्षाचालकांनाही इथे कायम प्रवासी मिळत असल्यामुळे तिथे मोठय़ा प्रमाणात रिक्षाही उभ्या असतात. भर चौकात वळणावर रिक्षा उभ्या करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी होते. प्रवासी चढ-उतार करताना येथेच थांबत असल्याने मागून येणाऱ्या वाहनास थांबावेच लागते. एक वाहन थांबले की त्याच्या मागोमाग अनेक वाहनांची रांग लागते.

हिरवे सिग्नल असूनही वाहने पुढे का जात नाहीत, या विचाराने अनेक वाहनचालक कर्कश हॉर्न वाजवतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. तेथील रुग्णावाहिकाही या कोंडीत अडकून पडतात. सकाळी आणि संध्याकाळी शाळा भरताना आणि सुटताना शाळेच्या बस आणि व्हॅनची गर्दी होते.

जो तो आपले वाहन मिळेल तेथून दामटवत असतो. त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडते. एवढे होत असूनही रिक्षाचालक मात्र प्रवासी मिळाल्याशिवाय रिक्षा हलवत नाहीत. त्यामुळे अनेकदा रिक्षा चालक व अन्य वाहनचालकांचे वादही झडत होतात. या बाबत उपप्रादेशिक अधिकारी संजय डोळे यांना विचारले असता त्यांनी आम्ही काय करू शकतो, जे वाहतूक पोलीस करतात तशीच कारवाई आम्ही करू, असे सांगितले.

बेकायदा रिक्षा थांब्यामुळे निश्चितच वाहतूककोंडी होते. रिक्षाचालाकांवर नियमित कारवाई केली जाते. या बाबत आम्ही संबंधित विभागलाही कळवले आहे.

– सचिन कोंडरे,  साहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग

सध्याच्या जागेपासून अवघ्या १५-२० पावलांवर रिक्षा थांबा सुरू केल्यास फारसा त्रास होणार नाही. ऐन वळणावर थांबा असल्याने समस्या उद्भवतात. आम्ही अनेक वर्षांपासून हा थांबा हटवण्याची मागणी करत आहोत, मात्र परिणाम नाही.

– विपिन पाटील, रहिवासी