खारघर टोलनाक्याजवळील उन्नत मार्गावर पथदिव्यांवर विनापरवाना फलक लावत शेतकरी कामगार पक्षाने आचारसहिंतेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाचे पथक यावर कारवाई करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी युवराज बांगर यांनी गुरुवारी दिली.

खारघर टोल नाका येथील उन्नत मार्गावरील सर्व पथदिव्यांवर शेकापने परवानगी न घेता फलक लावले आहेत. पनवेल महानगरपालिकेने आणि सिडकोने शहरातील ठरावीक जागांवर फलक लावण्यास परवानगी दिली आहे. परवाना विभागाने पथदिव्यांवर फलक लावण्यास परवानगी न दिल्याने आचारसंहिता भंग तसेच मालमत्ता विद्रूपीकरणाअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

१४ उमेदवारांना प्रचाराची परवानगी

निवडणूक घोषित झाल्यापासून १४ उमेदवारांनी प्रचारासाठी परवानगी घेतली आहे. यामध्ये जाहिराती, प्रचारासाठी फलक लावणे, वाहनांद्वारे प्रचार, पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाची परवानगी अशा परवानग्या देण्यात आल्या आहेत. वाहन खर्च १००० रुपये आणि एलईडीसाठी १००० रुपये आहे. सेवा कर आकारण्यात येणार आहे.

शेतकरी कामगार पक्षाने आचारसंहितेदरम्यान फलक लावण्यासाठी रीतसर परवानगी घेतली आहे. कोणत्याही भागात विनापरवानगी प्रचार करण्यात आलेला नाही.

विवेक पाटील, माजी आमदार, शेतकरी कामगार पक्ष आचारसंहितेचा भंग झाल्यास, पथक कारवाई करते. परवाना विभागाकडून पथदिव्यांवर फलक लावण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

जमीर लेंगरेकर, उपायुक्त, परवाना विभाग

कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेवर, पथदिव्यांवर फलक लावण्यास मनाई आहे. असे पोस्टर लावल्यास आचारसंहितेच्या भंगाची कारवाई केली जाणार आहे.

युवराज बांगर, निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग ४, ,