News Flash

सीबीडी पोलीस ठाण्यात बेकायदा बांधकाम?

सीबीडी पोलीस ठाण्याच्या परिसरात एक निवारा शेड उभारण्यात येत आहे.

सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक महिन्यांपासून एक बेकायदा शेडचे काम सुरू आहे.

कोनशीलेवर पोलीस अधिकाऱ्याचे नाव

शेखर हंप्रस, नवी मुंबई

सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक महिन्यांपासून एक बेकायदा शेडचे काम सुरू आहे. काही महिन्यांपासून तिथे बेकायदा कॅन्टीनही सुरू करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आणि मनपा दोघांनीही कानावर हात ठेवले आहेत. विशेष म्हणजे जे बेकायदा शेड उभे करण्यात येत आहे तिथे तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याचे नाव असलेली कोनशीलाही लावण्यात आली आहे. एखाद्या राजकीय व्यक्तीप्रमाणे श्रेय देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सीबीडी पोलीस ठाण्याच्या परिसरात एक निवारा शेड उभारण्यात येत आहे. चारही बाजूंना लोखंडी खांब, त्याखाली सिमेंटचा पाया आणि वर पत्रेही टाकण्यात आले आहेत. अनेक वर्षांपासून हे काम रखडले आहे. आधीच कमी असलेली जागा अधिकच अरुंद झाल्यामुळे तक्रारदार आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची वाहने उभी करण्यास जागाच शिल्लक राहिलेली नाही. ही शेड कशासाठी बांधण्यात येत आहे, बांधकाम अर्धवट का सोडण्यात आले आहे, पालिकेची परवानगी घेतली आहे का, याबाबत कोणीच काही माहिती देत नाही. मात्र या शेडसाठी कुठलीही परवानगी घेतली गेली नसल्याची माहिती एका माहीतगाराने दिली.

पत्र्याची खोली बांधून एक कॅन्टीनही उभारण्यात आले आहे. येथे चहा कॉफीच नव्हे तर दुपारी खानावळीप्रमाणे जेवण आणि सकाळ संध्याकाळ नाश्ताही मिळतो. ‘साहेबां’च्या कृपेने खारघर येथील एका व्यक्तीने हे कॅन्टीन सुरू केल्याची माहिती कॅन्टीनमधील एका कामगाराने दिली. बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी पालिका पोलीस संरक्षण घेतात, मात्र पोलीस ठाण्याच्या आवारातच बेकायदा काम होत असेल, तर त्यावर कारवाई करण्यासाठी कोण संरक्षण देणार, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

मी येण्यापूर्वीपासून पोलीस ठाण्याची रचना अशीच होती. मला यातील काहीच माहिती नाही, मात्र मी रचनेत बदल केलेला नाही.

– जयराज छापरिया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

याबाबत पूर्ण माहिती घेण्यात येईल. बेकायदा बांधकाम शेड, पत्र्याची खोली असे काही आढळून आले तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. कॅन्टीनचे परवानेही तपासून योग्य ती कारवाई केली जाईल.

– निशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 3:22 am

Web Title: illegal construction in cbd police station
Next Stories
1 बेकायदा दुकानांच्या पुन्हा रांगा
2 ठाणे-बेलापूर प्रवास वेगवान
3 अनिकेत तटकरेंना भाजपचा पाठिंबा?
Just Now!
X