News Flash

बेकायदा मंडईवर पालिकेचा हातोडा

दत्तगुरु सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

सारसोळे येथील मंडई जमीनदोस्त; दत्तगुरु सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

सारसोळे येथे सिडकोच्या भूखंडावर महापालिकेने उभारलेली बेकायदा मंडई शुक्रवारी महापालिकेनेच जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे दत्तगुरू सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही बेकायदा बांधलेली मंडई जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यानंतर अखेर महापालिकेनेच ही मंडई जमीनदोस्त केली.

सिडकोने दत्तगुरू सहकारी गृहनिर्माण संस्थेला दिलेल्या सारसोळे येथील भूखंडावर महापालिकेने भूखंड हस्तांतरण करण्यापूर्वीच बेकायदा ही मंडई बांधली होती. या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासासाठी परिसरात असलेल्या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. परंतु बेकायदा मंडई पाडल्याशिवाय ही पुनर्बाधणी करता येत नव्हती. त्यामुळे ‘दत्तगुरू’मधील १३६ कुटुंबांचा जीव टांगणीला लागला होता.

पालिकेने सारसोळे सेक्टर ६ येथील भूखंड क्रमांक ११ वर ही मंडई बांधली होती. त्यासाठी २४ लाख ८३ हजार २८८ रुपये खर्च आला होता. मंडईत ३० ओटे होते. मंडईचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन महापौर सागर नाईक यांच्या हस्ते २५ फेब्रुवारी २०१५ रोजी मंडईचे उद्घाटनही करण्यात आले. पण ही मंडई प्रत्यक्ष वापरात नसल्याने ती गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली होती. आता पालिकेने बेकायदेशीरपणे बांधलेली ही मंडई पालिकेलाच जमीनदोस्त करावी लागली. ही मंडई वाचविण्यासाठी सारसोळेचे प्रल्हाद पाटील यांनी प्रयत्न केला होता. मुख्यमंत्र्यांकडेही लेखी निवेदन देण्यात आले होते. ‘दत्तगुरू’च्या शेजारी ‘सिडको’च्या भूखंडावर बांधलेली ही मंडई सात दिवसांत तोडून टाकावी आणि येथील जागा या इमारतीच्या पुनर्विकासासाठी देण्याचे सिडकोने मान्य करून तसे पत्र सहा महिन्यांपूर्वी महापालिकेला दिले होते.

नियमानुसार दत्तगुरू सोसायटीच्या हक्काचे असलेले ३९४ मीटर क्षेत्र कंडोमिनियम प्लॉटमध्ये करून देण्याची मागणी सिडकोकडे दत्तगुरूकडून २००९ पासून करण्यात येत होती. त्याला ‘सिडको’ने मंजुरी दिल्यानंतर ‘दत्तगुरू’ने  ३९४ मीटर क्षेत्राचे पैसेही सिडकोला भरले होते. अडीच चटईक्षेत्र निर्देशांकाद्वारे (एफएसआय) पुनर्बाधणी शक्य नसल्याने ‘सिडको’कडून इमारतीला अतिरिक्त जागा देण्याबाबत पालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. सिडकोने १९८७ मध्ये डिमांड रजिस्ट्रेशन स्कीम म्हणजेच ‘डीआरएस’ योजनेंतर्गत नेरुळ येथील सेक्टर सहा येथे ए प्रकारच्या इमारतींचे नियोजन केले होते. सुरुवातीला ए प्रकारच्या इमारती नेरुळ सेक्टर २४ येथे बांधल्या जाणार होत्या. नंतर सिडकोने नेरुळ सेक्टर ६ मध्ये ए-एक, ए-दोन प्रकारच्या इमारती बांधल्या. दोन्ही इमारतींमध्ये एकूण १३६ कुटुंबे राहात असून ही सर्व कुटुंबे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील आहेत.

दत्तगुरू सोसायटीचा पुनर्बाधणीचा प्रश्न सोडविला नाहीतर महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक सूरज पाटील यांनी दिला होता. ‘सिडको’ आणि महापालिकेकडे पुनर्विकासासाठी आम्ही रहिवासीही प्रयत्न करत होतो. ‘लोकसत्ता’नेही आमचा प्रश्न  लावून धरला होता. आता मंडई पाडल्यामुळे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. हा भूखंड आम्हाला हस्तांतरित करण्याचे ‘सिडको’ने तत्त्वत: मान्य केले होते. महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला आहे.    – राजेंद्र बागल, अध्यक्ष, दत्तगुरु सोसायटी

दत्तगुरू सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या शेजारील जय दुर्गा मंडई पाडण्याचा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मंडई पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे.      – संजय तायडे, विभाग अधिकारी, नेरुळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:46 am

Web Title: illegal construction in navi mumbai 5
Next Stories
1 गोदाम कामगारांचे प्रश्न अनुत्तरितच
2 नवी मुंबईचा निकाल ९३.७४ टक्के
3 बाजारात उलटय़ा, मॅजिक छत्र्यांची जादू
Just Now!
X