सिडको, पालिकेची टोलवाटोलवी; कोणत्याही प्राधिकरणाचे नियंत्रण नाही

पनवेलमध्ये वेगाने फोफावलेल्या पाळणाघर आणि प्ले ग्रुपवर कोणाचाही अंकुश नसल्याचे गुरुवारी उघडकीस आलेल्या पूर्वा प्लेग्रुप मारहाण प्रकरणाने सिद्ध झाले आहे. केवळ धर्मादाय आयुक्त आणि दुकाने व बाजार समितीचे नोंदणीकृत प्रमाणपत्र मिळविले की झाले, अशी स्थिती सध्या आहे. या संस्थांवर कोणाचे नियंत्रण आहे, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. सिडको आणि महापालिकेच्या टोलवाटोलवीत पाळणाघरे मोकाट सुटली आहेत.

वाढते नागरीकरण आणि शिक्षणाच्या चांगल्या सुविधा यामुळे पनवेल, नवी मुंबई परिसरात घर घेण्यास प्राधान्य देणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. नोकरी करणाऱ्या या पालकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेकांनी पाळणाघर, प्ले ग्रुप, डे केअर सेंटर सुरू केली आहेत. मात्र त्यांच्यावर कोणताही अंकुश नाही. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी संबंधित क्षेत्र हे सिडको प्रशासनाने महापालिकेला हस्तांतरित न केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यानुसार या पाळणाघर, डे केअर सेंटरवर र्निबध कसे घालणार असा प्रश्न उपस्थित केला. सिडकोने अद्याप खारघर परिसरातील बांधकामे सुरू असेली क्षेत्रे महापालिकेला हस्तांतरित केलेली नाहीत. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या सिडको क्षेत्रातील भागांना हस्तांतर पूर्ण होईपर्यंत कोणीही वाली नसल्याचे बोलले जाते. प्रत्येक घटनेला पोलीसच जबाबदार असे मानून सध्या पनवेल परिसरातील सर्व कामे सुरू आहेत.

खारघरमधील सेक्टर १० येथील रुचिता सिन्हा यांच्या दहा महिन्यांच्या बालिकेवर २१ तारखेला झालेल्या अमानुष मारहाणीनंतर पाळणाघर, डे केअर सेंटर व प्ले ग्रुपला परवानगी कोणते विभाग देतात याविषयी पोलिसांना माहिती नव्हती. पोलिसांनी मालकांकडे परवानगीची कागदपत्रे मागितल्यानंतर त्यांनी रायगड जिल्ह्य़ाच्या साहाय्यक धर्मादाय आयुक्तांची स्वाक्षरी असलेले नोंदणी प्रमाणपत्र सादर केले. पूर्वा एज्युकेशन ट्रस्ट नावाने प्रवीण निकम यांनी ही प्रमाणपत्र मार्च महिन्यात मिळविले होते. त्याव्यतिरिक्त कोणतेही इतर कागदपत्रे निकम यांनी पोलिसांना दिली नाहीत.

या घटनेची माहिती बाल संरक्षण विभागाने घेतली असून बालकांच्या संरक्षण हक्कांविषयी कोणते गुन्हे प्रियंका व अफसाना यांच्यावर दाखल होतील याची माहिती हा विभाग घेत आहे. शिक्षण व बाल कल्याण विभागाकडे ‘डे केअर सेंटर’ व ‘पाळणाघरां’ची कोणतीही नोंद नाही. खारघरमध्ये किती पाळणाघर व डे केअर सेंटर आहेत याची आकडेवारी पोलिसांकडेही नाही. निकम दाम्पत्यांनी सेक्टर १० येथे सुरू केलेल्या पूर्वा प्ले ग्रुपला शिक्षण विभागाची मान्यता नाही. तिथे सुमारे सहा मुले गुरुवापर्यंत येत होती. शुक्रवारपासून या पालकांनी आपल्या पाल्यांना तिथे पाठविणे बंद केले आहे.

बाल संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल

खारघर प्ले ग्रुप प्रकरणात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी पालकांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर आता या प्रकरणातील आरोपींवर आणखी काही कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी प्रियंका निकम आणि अफसाना शेखवर नव्याने कलम ३०७ दाखल करण्यात आले आहे. शिवाय बालसंरक्षण कायद्याअंतर्गत अधिनियम ७४, ७५ आणि ७६ कलमही दाखल केले आहे. या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपी प्रियंका निकम हिला पोलिसांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. महिला बाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आणि पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. बाल अधिनियमन कायद्यातील कलमे लावण्याच्या सूचना बाल विकास अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी केल्या आहेत.

घटनाक्रम

  • २१ नोव्हेंबर : रुचिता सिन्हा यांनी आपल्या १० महिन्यांच्या मुलीला प्रथमच या पाळणाघरात ठेवले. संध्याकाळी मुलीला जखमा झाल्याचे दिसले. त्यांनी जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
  • २२ नोव्हेंबर : रुचिता यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले. सिन्हा यांनी पाठपुरावा केल्यानंतर पाळणाघरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली.
  • २३ नोव्हेंबर : रात्री हलगर्जीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
  • २४ नोव्हेंबर : न्यायालयाने अफसानाला न्यायालयीन कोठडी ठोठावली आणि प्रियंकाला जामीन मंजूर केला. या दिवशी सीसीटीव्ही फुटेज प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाले.
  • २५ नोव्हेंबर : अफसाना आणि प्रियंकाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राजकीय पक्षांकडून मोडतोड

शुक्रवारी राजकीय पक्ष या प्रकरणात उतरले. शेकाप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध करत पूर्वा प्ले ग्रुपच्या दर्शनीभागाची तोडफोड केली. या वेळी काही पालकांनी आपण अन्य प्ले ग्रुपमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल का, हे प्ले ग्रुप आपल्या पाल्यांसाठी सुरक्षित आहेत का, याविषयी चाचपणी करत असल्याचे सांगितले. काही पालकांनी या घटनेचा निषेध करत लवकरच मेणबत्ती फेरी काढणार

‘मौसीने आज मारा’

मारहाण झाल्यानंतर याच पाळणाघरात आपली बाळे ठेवून कामावर जाणाऱ्या पालकांनी आज सकाळी आपली व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली. याच परिसरात राहणाऱ्या आश्विनी यांचा मुलगा याच पाळणाघरात असायचा. त्याने काही दिवसांपूर्वी ‘मौसीने आज मारा’ अशी तक्रार केली होती. मात्र तो खोडकर असल्यामुळे त्यानेच काही तरी केले असणार असा समज होऊन त्यांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. गुरुवारी आया अफसाना क्रूरतेने मारत असल्याची दृश्ये पाहून धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.