25 February 2021

News Flash

बेकायदा गोदामांमुळे आगीचा धोका

अग्निशमन उपाययोजनांकडे पनवेल पालिकेचे दुर्लक्ष

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अग्निशमन उपाययोजनांकडे पनवेल पालिकेचे दुर्लक्ष

धानसर गावापासून सुरू झालेली बेकायदा गोदामांची गर्दी, कळंबोलीतील लोखंड बाजारातील अनियंत्रित व्यवसाय व अवजड वाहनांचे बेकायदा पार्किंग यामुळे पनवेल परिसरात वारंवार अग्नितांडव होत असताना पालिका अग्निसुरक्षा उपाययोजनांत आणि अग्निशमनात सपशेल अपयशी ठरली आहे. पनेवल तालुक्यामधील ८० टक्के क्षेत्र महापालिका प्रशासनाकडे वर्ग झाले असूनही आगीच्या घटनांची मालिका कायम राहिली आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्त विरुद्ध प्रशासन असा सामना रंगत असताना अग्निसुरक्षेचा मुद्दा मात्र बासनात बांधला गेला आहे.

धानसर गावाजवळ हजारांहून अधिक बेकायदा गोदामे आहेत. अग्निशमन दलाचा परवाना न घेता बांधलेल्या या गोदामांच्या रांगा रोहिंजण, धरणाकॅम्प व तळोजा गावापर्यंत पोहोचल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या छत्रछायेत गोदामांचे पेव फुटले. मिळेल त्या जागेवर सिमेंट व लोखंडी पत्र्याचे कुंपण उभारून व्यवसाय थाटण्यात आले. भंगार व्यावसायिकांना हे सर्व सोयीचे असल्याने मुंबई गोवंडी येथील भंगार व्यावसायिकांनी शिळफाटा व त्यानंतर धानसर ते रोहिंजण या जागेवर आपले बस्तान बसविले. लोकप्रतिनिधींची तोंडे बंद करून भंगार नगरी वसविण्यात आली.

सध्या हा परिसर महापालिका क्षेत्रात आल्याने या गोदामांची जबाबदारी पालिकेवर आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात किती गोदामे बेकायदा आहेत, या गोदाममालकांनी अग्निशमन यंत्रणेची परवानगी घेतली आहे का, याची माहिती पनवेल पालिकेच्या दफ्तरी नाही. २६ नोव्हेंबर २०१७ला खारघर येथे सचिन तेंडुलकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयाचे भूमिपूजन झाले, तेव्हा रोहिंजण गावाजवळ आग लागली होती. प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असल्याने या आगीकडे पोहोचण्यास सुरक्षा यंत्रणेला विलंब झाला. आग विझवल्यावर पालिका प्रशासनाने या परिसराची झाडाझडती घेऊन दोन गोदाममालकांवर गुन्हे दाखल केले. मात्र या कारवाईनंतरही आगीवर नियंत्रण येण्याऐवजी या घटना वाढल्या.

या परिसराचे शहर सर्वेक्षण न झाल्याने ही गोदामे बेकायदा ठरविण्याचे सोपस्कार अद्याप झालेले नाहीत. जोपर्यंत ही गोदामे बेकायदा ठरत नाहीत तोपर्यंत तेथे सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी कोणत्या प्रशासनाची, हा प्रश्न समोर येत आहे.

२५ हजार लोकसंख्येमागे एक जवान

पनवेल पालिकेच्या अग्निशमन दलाचा भार अवघ्या ३२ जवानांच्या खांद्यांवर आहे. त्यापैकी २५ जण कंत्राटी जवान आहेत. सुमारे आठ लाख लोकवस्ती असलेल्या पनवेल पालिका क्षेत्रात ११ विविध अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे. धानसर परिसरातील गोदामांची संख्या लक्षात घेता तेथेही स्वतंत्र अग्निशमन केंद्राची आवश्यकता आहे. १०हून अधिक अग्निशमन बंबाची व सुमारे साडेचारशे जवानांची आवश्यकता आहे. याबाबत पनवेल पालिकेच्या अग्निशमन दलाने वरिष्ठांकडे मागणी केली आहे. सध्या २५ हजार नागरिकांसाठी एक जवान अशी अग्निशमन यंत्रणेची गंभीर स्थिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 1:52 am

Web Title: illegal godown in navi mumbai
Next Stories
1 आगरी बापये आणि बायका
2 चाचणी मार्गिकेअभावी रस्त्यावरच वाहनतपासणी
3 ‘सेझ’मधील घरांना मंजुरी
Just Now!
X