स्वच्छ शहर अभियानाला खो; विद्रुपीकरणाला आळा घालण्यात अपयश

स्वच्छ भारत अभियानात देशात अव्वल येण्यासाठी नवी मुंबई पालिका गेली चार वर्षे जंगजंग पछाडत असताना शहरातील बेकायदेशीर फलकबाजीने या अभियानाला पुरता खो घालण्याचा चंग बांधला आहे. विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियानासाठी कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्या पालिका या विद्रुपीकरणाला आळा घालण्यास मात्र अपयशी ठरली आहे. सध्या नाताळ, नवीन वर्षांच्या तसेच जयंती, पुण्यतिथी आणि श्रेयवादाच्या फलकबाजीचे सर्वत्र पेव फुटले आहे.

दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दहा महिन्यांच्या काळात शहरात एकही बेकायदेशीर फलक दिसून आला नव्हता. परवानगी घेऊन फलक लावणाऱ्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकी झाली होती.

शहरात फलकबाजी लावण्याची परवानगी देण्याचे सर्वाधिकार त्या त्या प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही बेकायदेशीर फलकबाजी रोखण्यात हे प्रभाग अधिकारी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. परवानगी घेऊन फलक लावणारे दोन फलकांची रीतसर परवानगी घेतात आणि त्यामागे वीस फलक लावत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबईत सध्या अनेक नियुक्त्या, सण-समारंभ आणि सोहळे पार पडत आहेत. त्यात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना इच्छुक उमेदवारांना सक्रिय केले आहे. त्यासाठी त्यांना कार्यक्रम घेण्यास भाग पाडले जात असून लागणारी आर्थिक रसद पुरवली जात आहे. या कार्यक्रमांची जाहिरातबाजी बेकायदेशीर फलकबाजीने केली जात असून शहराच्या प्रत्येक कोपऱ्यावर हे बेकायदेशीर फलक लावले गेले आहेत. मंगळवारच्या नाताळपासून सुरू होणारे नवीन वर्षांची रेलचेल या बेकायदेशीर फलकबाजीने संपूर्ण शहरात दिसून येत आहे.

नवी मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना मुख्यमंत्र्यांनी नुकतेच वडार समाज समन्वय समितीचे अध्यक्षपद जाहीर करताना राज्यमंत्री दर्जा जाहीर केला आहे. त्यामुळे चौगुले यांच्या हितचिंतकांनी नवी मुंबई बेकायदेशीर फलकबाजीने धुडगूस घातला आहे. काही नगरसेवकांनी तर सोसायटींचा आतील भाग खरेदी केल्यासारखाच कायमस्वरूपी फलकबाजीसाठी राखून ठेवला आहे. पालिकेच्या छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांचे श्रेय लाटण्यासाठी स्थानिक नगरसेवक भपकेबाज पोस्टरबाजी करीत आहेत.

पालिकेने स्वच्छ भारत अभियानात स्वत:ला झोकून दिले असून चांगल्या भिंती रंगवण्यास सुरुवात केली आहे. या रंगवलेल्या छानशा भिंतीच्या समोरच फलकबाजी आडवी लावली जात असल्याचे दृश्य आहे. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी या संदर्भात कठोर उपाययोजना न केल्याने प्रभाग अधिकाऱ्यांचे फावले आहे. पालिका प्रशासनाने वाढत्या बेकायदेशीर फलकबाजीवर चिंता व्यक्त करताना प्रभाग अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे कारवाईचे आदेश दिलेले आहेत.

ऐरोली आघाडीवर

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील जाहिरातबाजीवर प्रश्नचिन्ह उठविले आहे, मात्र नवी मुंबईत या बेकायदेशीर फलकबाजीवर कोणाचाही अंकुश नसल्याचे चित्र आहे. ऐरोलीत या बेकायदेशीर फलकबाजीने आघाडी घेतली आहे. वाशी, नेरुळ, बेलापूर, कोपरखैरणे येथील मोक्याच्या ठिकाणी ही फलकबाजी शहर विद्रुपीकरणाला हातभार लावत आहे.

शहराला विद्रूप करणाऱ्या बेकायदेशीर फलकबाजीवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले असून दररोज सकाळी दोन तास प्रत्येक प्रभाग अधिकारी ही बेकायदेशीर फलकबाजी हटविण्यास येत आहे. सण-समारंभाच्या निमित्ताने ही बेकायदेशीर फलकबाजी ठळकपणे दिसून येते. त्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.    -रवींद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका