महापौर, उपमहापौरांच्या अभिनंदनासाठी बेकायदा फलक

नवी मुंबईच्या महापौरपदी जयवंत सुतार व उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांची निवड होताच शहरात रस्तोरस्ती फुकटच्या शुभेच्छांना ऊत आला आहे. बेलापूर, नेरुळसह विविध भागांत मोठय़ा प्रमाणात फलकबाजी करण्यात आली असली, तरीही त्यासाठी ना पालिकेची परवानगी घेण्यात आली आहे, ना शुल्क भरण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात शहराच्या चौकाचौकात झळकणाऱ्या बेकायदा फलकांवर र्निबध आणले होते; परंतु आता पुन्हा अर्निबध फलकबाजी सुरू झाली आहे. महापौर व उपमहापौरांची निवड गुरुवारी झाल्यानंतर शुक्रवारी लगेचच किल्ले गावठाण चौक, नेरुळ रेल्वे स्थानक परिसर, शिरवणे गाव परिसर, नेरुळ शिवाजी महाराज चौक, पामबीच चौक या भागांत उत्साही कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावले आहेत. परंतु यांपैकी अनेक फलकांसाठी परवानगीच घेण्यात आलेली नाही. पालिकाही अशी फुकटय़ा कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शहराच्या सौंदर्यात अडथळा येत आहे.

महापौर जयवंत सुतार हे नेरुळ विभाग कार्यालय क्षेत्राचे तर उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे या घणसोली विभाग कार्यालय क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या विभागात जास्त फलकबाजी करण्यात आली आहे. नेरुळ विभागात फक्त ११ जाहिरातींना परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यापेक्षा किती तरी अधिक जाहिराती या विभागात झळकत आहेत. घणसोली विभागातील परवानगी घेतलेल्या जाहिरातींची संख्या मिळू शकली नाही.   पालिका क्षेत्रात शुभेच्छा किंवा जाहिरातीचे फलक लावण्यासाठी पालिकेच्या परवाना विभागाकडून तसेच विभाग कार्यालयाकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते आणि योग्य शुल्क भरावे लागते. फलक किती दिवस आणि कोठे लावायचा यावर र्निबध आहेत. महापालिकेने फलक लावण्यासाठी शहरातील विविध जागा व चौक निश्चित केले असताना अनेक वेळा त्याव्यतिरिक्त कुठेही फलक लावल्याचे दिसते. सध्या नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, बेलापूर, विभागांत फलक झळकत आहेत. नेरुळमधील पामबीच मार्गावरील सारसोळे चौक, नेरुळ स्थानक, एमटीएनएल शेजारील सेक्टर ११ येथील चौक, नेरुळ बसस्थानक परिसरात सातत्याने फलकबाजी होत आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

परवानगी क्रमांक नाही

परवानगी घेतल्यावर फलकावर लावण्यासाठी पूर्वी स्टिकर दिले जात. परंतु या स्टिकर्सच्या झेरॉक्स प्रती चिकटवल्याचे प्रकार समोर आल्यानंतर आयुक्त रामास्वामी एन. यांनी छपाई करतानाच त्याच्यावर परवाना क्रमांक, आकार, ठिकाण, कालावधी नमूद करणे बंधनकारक केले. महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकांपैकी अनेक फलकांवर ही माहिती नाही.

फलकांसाठीचे नियम..

शहरात १२१ ठिकाणे जाहिरातींसाठी निश्चित करण्यात आली आहेत. फक्त तीन दिवसच जाहिरात लावण्याची परवानगी दिली जाते. त्यात १०० रुपये अनामत रक्कम, २०० रुपये भुईभाडे, एक चौरस फूट जागेसाठी १५ रुपये तर त्यानंतरच्या प्रत्येक चौरस फुटासाठी ७.५० रुपये आकारले जातात. फलक लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेणेही आवश्यक असते.