18 September 2020

News Flash

गॅरेज, फेरीवाल्यांकडून रस्ते गिळंकृत

पाणीटंचाई आणि अस्वच्छता या समस्याही अद्याप सुटलेल्या नाहीत.

वाढत्या लोकसंख्येबरोबरच पाणीटंचाई आणि अस्वच्छतेचीही समस्या

कामोठे शहर हे सिडकोला न सुटलेले कोडे आहे. या परिसरातील लोकवस्ती झपाटय़ाने वाढली, मात्र त्याच वेगाने येथील समस्याही वाढू लागल्या. आता महापालिकेने तरी यातून सुटका करावी, अशी येथील रहिवाशांची इच्छा आहे. या प्रभागाची सर्वात मोठी समस्या आहे वाहतुकीची. येथील रस्ते आणि पदपथ अनधिकृत गॅरेज आणि फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहे. पाणीटंचाई आणि अस्वच्छता या समस्याही अद्याप सुटलेल्या नाहीत.

कामोठे शहर वसण्याआधी येथे कामोठे, जुई, नौपाडा आणि छोटी औद्योगिक वसाहत अस्तित्वात होती. १७ वर्षांपूर्वी हे परिसर एकत्र आणत सिडकोने कामोठे शहर वसवले. शहरातील लोकवस्ती आणि बांधकामे वाढली, मात्र नागरी सुविधांकडे लक्ष देण्यात आले नाही. प्रभागात अधिकृत वाहनतळ नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावर आणि पदपथांवरच उभी केली जातात. परिणामी कामोठेतील सेक्टर १ ते सेक्टर ६ दरम्यान पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करण्यास मनाईच असल्यासारखे चित्र आहे. मानसरोवर रेल्वे स्थानकातून रिक्षा व बसची सेवा आहे, मात्र प्रभागाच्या  अंतर्गत भागात या सेवा नाहीत. त्यामुळे पायी जाण्याशिवाय पर्याय नसतो.

या विभागात रुग्णालये, उद्याने, विरंगुळा केंद्र या सुविधा इतक्या वर्षांत निर्माण करण्यात आलेल्या नाहीत. जव्हार औद्योगिक वसाहतीत सोयीसुविधांचा अभाव आहे. महामार्गाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एम. जी. एम. रुग्णालय आहे, मात्र तिथे जाण्यासाठी बसची सोय नाही.

मोकळ्या भूखंडांवर राडारोडा

शहरी भागांत राडारोडा टाकण्याची परवानगी नसताना या प्रभागात अनधिकृतपणे राजरोस राडारोडा टाकला जातो. वर्दळीच्या ठिकाणी व मोकळ्या भूखंडावर राडारोडय़ाचे ढिगारे साचले आहेत. त्याच्या चारही बाजूंनी नागरी वस्ती आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना धुळीची समस्या भेडसावते. याआधी येथे मोठे डम्पर, जेसोबी पार्क केले जात. परंतु नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर त्यांना मनाई करण्यात आली आहे.

untitled-7

प्रभाग क्षेत्र

  • कामोठे सेक्टर १ ते ६, ६ अ, ८, ९, सेक्टर २१ ते सेक्टर २४, नावपाडा गाव, एमजीएम रुग्णालय

नौपाडय़ातील स्थिती बिकट

  • नौपाडा हे गाव समस्यांनी ग्रासलेले आहे. तिथे वेळेवर पाणी मिळत नाही. त्यामुळे शहराजवळ असूनही हे गाव उपेक्षित आहे. महिलांना पायपीट करून पाणी भरावे लागते. दोन-तीन दिवसांनी पाणी येते. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. पण तिचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे तिचा काहीच वापर होत नाही.
  • गावात सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी देखील नाही. रस्त्यांचे नियोजन नाही. गावाच्या प्रवेशद्वारावरच नाला आणि त्यातील दरुगधी स्वागतास सज्ज असते. हा नाला कचरा आणि गाळाने तुंबला आहे. त्याची सफाई करण्यात यावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.
  • येथे होत असलेली नवीन वसाहत व विटभट्टय़ांचा मोठा त्रास येथील रहिवाशांना होतो. या वीटभट्टय़ांचे अन्यत्र स्थलांतर करावे आणि येथील प्रदूषणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 12:29 am

Web Title: illegal lgarages hawkers capture road in kamothe water shortage issue
Next Stories
1 महाआघाडीचे सूत्र निश्चित
2 शिवसेनेच्या हालचालींवर भाजपचा ‘पहारा’
3 मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात ३१ हजार झाडांचा बळी?
Just Now!
X