कारवाई करण्याचे महापालिकेचे संकेत

वाशी येथील येवले या रुग्णालयावर बेकायदा मोबाइल टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पालिकेने दिले आहेत.

बालकांसाठीचे रुग्णालय अशी येवले रुग्णालयाची ओळख आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार कोणत्याही शाळा, महाविद्यालय किंवा रुग्णालयाच्या ३ किलोमीटरच्या परिघात मोबाइल टॉवर बसवण्यास बंदी आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णालयावर मोबाइल टॉवर उभारण्यास परवानगी दिली नसल्याचे नगररचना अधिकाऱ्यांनी संगिलतले.

नवी मुंबई महापालिकेने २०१२-१३ दरम्यान ४२९ मोबाइल टॉवर उभरण्याची परवानगी दिली होती. रिलायन्स जिओला एकूण ७२ टॉवर उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापैकी जमिनीवर ३५ आणि इमारतींवर ३७ टॉवर उभारण्यात आले आहेत. परवानगी घेऊन टॉवर उभारला तरीही, त्या परवानगीचे एका वर्षांने नूतनीकरण करणे गरजेचे असते, मात्र बहुतेक टॉवर्सची  परवानगी रद्द करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. हे काम सुरू असल्याचे नगररचना विभागाने सांगितले.

नियम पायदळी

इमारतींवर मोबाइल टॉवर उभारून नंतर परवानगी घेण्याचे प्रमाण मोठे आहे. आधीच लाखो रुपये खर्च झाले आहेत, असे सांगत परवानगी मिळवली जाते. कोणत्याही रुग्णालयापासून तीन किलोमीटरच्या परिघात मोबाइल टॉवर बसवणे अनधिकृत आहे. त्यामुळे अनधिकृत टॉवरवर कारवाई केली जाईल.