पालिकेकडून ठोस उपाययोजना नाहीत; वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

नवी मुंबई पालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्यामुळे पामबीच मार्गावरील सतरा प्लाझा परिसरातील बेकायदा पार्किंग वाहनचालकांसह वाहतूक विभागाचीही डोकेदुखी ठरत आहेत. रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा अडथळा ठरत आहे. गेल्या सहा महिन्यांत वाहतूक पोलिसांनी दोन हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करूनही यात काही सुधारणा होत नाही. पालिका प्रशासन आश्वासनापलीकडे काहीही करताना दिसत नाही.

पामबीच हा शहरातील वेगवान मार्ग आहे. मात्र येथील अडथळ्यांमुळे या वेगाला ब्रेक लागत आहे. सतरा प्लाझा येथे विविध प्रकारची दुकाने, कार्यालये आहेत. कोपरीपासून विविध गाडय़ांच्या खरेदीविक्रीची व वाहनदुरुस्तीची दुकाने आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग होत आहे. तुर्भे सेक्टर १९ ई व १९ सी या ठिकाणी नियमानुसार वेअर हाऊस आहेत; परंतु व्यावसायिकांनी बेकायदा पामबीच मार्गाच्या बाजूने दुकानांचा प्रवेश सुरू केला आहे. विविध हॉटेल, मॉल, गाडय़ांच्या दुकानांची प्रवेशद्वारे ही पामबीच रस्त्याच्या बाजूला नसून ते मागील सेवारस्त्याला आहेत. मात्र या व्यावसायिकांनी परवानगी नसताना प्रवेशद्वारे पामबीच मार्गाकडे केली आहेत. त्यामुळे रस्त्यावरच बेकायदा वाहने उभी राहत आहेत.

पामबीच मार्गावर ‘व्हॅलेट पार्किंग’ हे नावापुरते सुरू आहे. वाशी आरेंजा कॉर्नर ते कोपरी पुलापर्यंत सातत्याने येथे बेकायदा पार्किंग केले जाते. पालिकेने या ठिकाणी मार्गरोधक लावण्याचा प्रस्ताव मंजूर करून कामाला सुरुवातही केली होती. मात्र मध्येच भिंत बांधण्याचा प्रस्ताव आला. मात्र अद्याप या दोन्हीपैकी एकही उपाययोजना अमलात आली नाही. पालिकेने या मार्गावर जवळजवळ १२५ ‘नो पार्किंग’चे फलक लावले आहेत. मात्र या फलकांखालीच वाहने उभी केलेली असतात. जिल्हाधिकारी यांनीही याबाबत पालिकेला फटकारले होते. मात्र अद्याप उपाययोजना झालेल्या नाहीत. न्यायालयानेही या समस्येची दखल घेत मार्गरोधिकांमुळे ही समस्या सुटणार नसून कायमस्वरूपी भिंत बांधण्याचे काय झाले, असा सवाल केला होता. मात्र तरीही पालिका कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

या संदर्भात पालिकेचे कार्यकारी अभियंता मनोज पाटील यांना विचारले असता, मार्गरोधिका लावल्यानंतरही पामबीचवर गाडय़ा लावून त्यावरून सामान खरेदी, विक्री व वाहनदुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे आझाद मैदानाभोवती लावण्यात आलेल्या जाळ्यांप्रमाणे उंच मार्गरोधिका उभे करण्यास आयुक्तांनी सांगितले असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

किती वेळा कारवाई करायची?

पामबीच मार्गावरील बेकायदा पार्किंग समस्या सोडविण्यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना करायला हवी. वाहतूक विभागामार्फत वारंवार कारवाई सुरू असते. फेब्रुवारी ते जुलै या सहा महिन्यांत आतापर्यंत २ हजार २२६ वाहनचालकांवर कारवाई करून १ लाख ७५ हजार ६०० रुपयांचा दंडही वसूल केला आहे. त्यामुळे किती वेळा कारवाई करायची, असा प्रश्न आमच्यासमोर आहे. या संदर्भात पालिकेला वारंवार स्मरणपत्रही पाठविण्यात आले असल्याचे एपीएमसी वाहतूक पोलीस अधिकारी अभय महाजन यांनी सांगितले.

सतरा प्लाझा परिसरात करण्यात येणारे बेकायदा पार्किंगबाबत उपाययोजना करण्यासाठी मार्गरोधिका बसविण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंतांना सांगितले आहे. या ठिकाणी फक्त जाळ्या लावून उपयोग नाही. त्यामुळे ठोस उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

– डॉ. रामास्वामी एन., महापालिका आयुक्त