बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाला वाकुल्या दाखवत वाशीच्या वेशीवर रस्त्याच्या कडेला वाहनांच्या रांगा लावणाऱ्या हॉटेलमालक आणि मॉल व्यवस्थापनाच्या मुसक्या आवळा, असे स्पष्ट आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्थानिक वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोपरी गावापासून वाशी शहर आणि पुढे पाम बीच मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या प्रशस्त रस्त्यालगतच्या मॉल आणि हॉटेलचालकांनी या रस्त्याचा एक पदर नियम धाब्यावर बसवून आपल्या ग्राहकांच्या वाहन पार्किंगसाठी गिळंकृत केला आहे. वारंवार तक्रारी येऊनही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसांना जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्या आदेशामुळे मोठी चपराक बसली आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरून नवी मुंबईतील वाशी तसेच त्यापुढील उपनगरांच्या दिशेने जाण्यासाठी कोपरी गाव ओलांडून पाम बीचमार्गे प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. याच मार्गावरील मॉल, फर्निचरची दुकाने, हॉटेल, वाहनांचे सुटेभाग विकणाऱ्या दुकानांकडून रहदारीच्या रस्त्यावर बेकायदा व्ॉलेट पार्किंग केले जात आहे.

‘लोकसत्ता महामुंबई’ने यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. काही नागरिकांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाने तक्रारींची दखल घेतली नसल्याचे निनावी पत्रही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते. ठाण्यात झालेल्या वाहतूक सुरक्षा समितीच्या बैठकीत डॉ. कल्याणकर यांनी या मुद्दय़ाला हात घालत तातडीने हॉटेलांबाहेरील बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने वाहतूक विभागाचे अधिकारी गांगरून गेल्याची चर्चा आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागानेही लक्ष घालवे, अशा सूचना कल्याणकर यांनी दिल्या आहेत.