नाममात्र शुल्क टाळण्यासाठी नियमभंग

सीमा भोईर, पनवेल</strong>

खारघर रेल्वे स्थानकाच्या आवारात अधिकृत वाहनतळ असूनही स्थानक परिसरात दुचाकींचे बेकायदा पार्किंग सुरू आहे. अशा प्रकारे स्थानक परिसरात कुठेही उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी चोरीला गेल्याची प्रकरणे घडली असूनही, वाहनधारक बेजबाबदारपणे तिथेच पार्किंग करत आहेत. अधिकृत वाहनतळाची क्षमता ७००-८०० दुचाकी सामावून घेण्याएवढी आहे. तिथे केवळ ४००-५०० दुचाकी उभ्या केलेल्या असतात. उर्वरित जागा रिकामी असूनही बेकायदा पार्किंग केले जात आहे.

खारघर स्थानकातील अधिकृत वाहनतळात दुचाकी आठ तास उभी करण्यासाठी १० रुपये शुल्क आकारले जाते. त्यापेक्षा आधिक वेळासाठी १५ रुपये आकारण्यात येतात.

दुचाकी महिनाभर पार्क करण्यासाठी पहिल्या महिन्यात ४०० रुपये व नंतर २५० रुपये भरून पास मिळवता येतो. तरीही अनेक वाहनचालक रेल्वे स्थानकाच्या परिसरात बेकायदा पार्किंग करत आहेत. शहरात अनेक दुचाकी चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्याचे मुख्य कारण बेकायदा पार्किंग हे आहे. खारघर पोलीस ठाण्यात दर महिन्याला पाच ते सहा दुचाकी आणि दोन ते तीन चारचाकी वाहने चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल होतात.

रेल्वे स्थानकात बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करणे ही जबाबदारी रेल्वेची नसून सिडकोची आहे. त्यांनी यासाठी उपाययोजना कराव्यात.

– आर.आर. सोलसे, स्टेशन मास्तर, खारघर रेल्वे स्थानक