दुतर्फा बेकायदा पार्किंग; कारवाईनंतरही रस्त्यावर वाहन दुरस्तीची दुकाने

नवी मुंबई</strong> : वेगवान पामबीच मार्गाला गेली अनेक वर्षे वाशीत ब्रेक लागत आहे. सतरा प्लाजा ते कोपरीगाव परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असून येथील गॅरेजवाले रस्त्यावरच वाहन दुरस्ती करीत आहेत. पालिका व वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने ही समस्या जटिल होत आहे.

नवी मुंबईचा ‘नेकलेस’ समजल्या जाणाऱ्या या पामबीच मार्गामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी झाला आहे. बेलापूर ते वाशीपर्यंत विनाअडथळा प्रवास केल्यानंतर मात्र वाशीत वाहनांना ब्रेक लागत आहे. सतरा प्लाझा ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत या रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग होत आहे. या बेकायदा पार्किंगने वाहतूक व्यवस्थेचा पुरता खेळखंडोबा होत आहे. ‘लोकसत्ता’ने हा प्रश्न वारंवार मांडला आहे.  तत्कालीन आयुक्त रामास्वामी यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. तर सतरा प्लाझाच्या व पुढील वाहने दुरुस्ती व सजावट करण्याऱ्या दुकानांच्या बाहेरील बाजुला कायमस्वरूपी भिंत बांधण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र याबाबत अद्याप पालिका प्रशासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही.

या रस्त्यावर अनेक बेकायदा गॅरेज व वाहनांचे विविध भाग विक्री करणारी दुकाने आहेत. पालिकेने या मार्गावर सुमारे १२५ नो पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र या फलकांखालीच ही बेकायदा पार्किंग केली जात आहे.

रस्त्यावरच वाहनांची दुरस्ती सुरू असते. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका व वाहतूक पोलीस कारवाई करतात. मात्र यात सातत्य नसते. काही दिवस गेल्यानंतर पुन्हा आहे तीच परिस्थिती या ठिकाणी असते.

सतरा प्लाझामध्ये विविध प्रकारची दुकाने, कार्यालये आहेत. या ठिकाणी येणारे ग्राहक तसेच कमचारी वर्ग यांची वाहने रस्त्यालगतच उभी असतात. तुर्भे सेक्टर १९ ई व १९ सी या ठिकाणी वेअर हाऊस आहेत. परंतु व्यावसायिकांनी पामबीच मार्गाच्या बाजूने बेकायदा दुकानांचा प्रवेश सुरू केला आहे. परंतू विविध हॉटेल, मॉल, नवीन वाहनांची दालने असून त्यांची प्रवेशद्वारे ही सर्विस रस्त्याला असतानाही व्यावसायिकांनीही प्रवेशद्वारे पामबीच रस्त्याच्या दिशेने सुरू केली आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीही पालिकेला फटकारले होते. मात्र अद्याप याबाबत ठोस भूमिका न घेतल्याने ही समस्या निर्माण होत आहे.   पामबीच मार्गावरील सतरा प्लाझा परिसरात दुतर्फा बेकायदा पार्किंबाबत अधिक लक्ष देऊन विशेष कारवाई करण्यात येईल, असे  वाहतूक विभागाचे पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.

पामबीच मार्गावर सतरा प्लाझा परिसरात करण्यात येणारे बेकायदा पार्किंग व बेकायदा व्यवसायाबाबत पालिकेकडून कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी सतत आठवडाभर तैनात ठेवले जातील. बेकायदा पार्किंगवर वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही वाहने जप्त केली जातील.

 –अमरिश पटनिगिरे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग