उरण शहरातील पाच अनधिकृत स्थळांवरील कारवाई सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. ही धार्मिक स्थळे २००९ पूर्वीची आहेत. त्यांचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल उरण नगरपालिकेला सादर करण्यात आला आहे. २०११मध्ये आलेल्या शासकीय अध्यादेशानुसार या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उरण नगरपालिकेने दिली.
उरणसारख्या विकसित होणाऱ्या शहरात सध्या तरी एकही अनाधिकृत धार्मिक स्थळ नसल्याचा दावा सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे अधीक्षक अभियंता आर. एस. नायक यांनी केला. अशा अनधिकृत धार्मिक स्थळाची नोंद आपल्याकडे नाही आणि तसे स्थळ कोठे निदर्शनासही आलेले नसल्याची पुस्ती त्यांना या वेळी जोडली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या परिसरात अशा प्रकारची अनधिकृत धार्मिक स्थळेच नसल्याचे उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. राजन यांनी म्हटले आहे.
अनधिकृत धार्मिक स्थळे हटविताना किंवा त्यांच्यावर कारवाई करताना आस्थापन, पोलीस यंत्रणांवर दबाव येत असल्याने शक्यत: अशा स्थळांवर कारवाईच होत नाही. अनेक ठिकाणी सामंजस्याने चर्चा करून पर्यायी जागा देऊन धार्मिक स्थळे हटविली जातात. उरण नगरपालिका क्षेत्रातील पाच अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल तयार करण्यात आला असून, शासनाच्या २०११ च्या अध्यादेशानुसार ही अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करण्यात येणार असून त्यांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांनी दिली.