अवैध प्रवासी वाहतूक केल्याचा ठपका; दिवागाव येथील घटना

ऐरोली येथील एका युवकास पावसात उभ्या असलेल्या तिघांना लिफ्ट देणे भलतेच महागात पडले. खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्यास बंदी असल्याचे सांगत वाहतूक पोलिसाने त्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड झाला तो झालाच, वर तो भरताना त्याला आणखी मनस्ताप सहन करावा लागला. आपल्या अनुभवातून इतरांनी शहाणे व्हावे म्हणून या तरुणाने हा अनुभव समाजमाध्यमावर कथन केला असता, तो २४ हजारांहून अधिक व्यक्तींनी ‘शेअर’ केला आणि त्याला सुमारे १४ हजार ‘लाईक’ मिळाले. त्यानंतर वाहतूक विभागाला जाग आली आणि लिफ्ट देण्यामागची भावना विचारात न घेता दंड ठोठावणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली आणि त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कायदा हा सर्वासाठी सारखा असतो आणि अजाणतेपणी किंवा एखाद्याला मदत करण्याच्या भावनेतून त्याचे उल्लंघन झाले तरी मनस्ताप सहन करावा लागतोच, याचा अनुभव ऐरोली येथे राहणाऱ्या नितीन नायर यांना नुकताच आला. १८ जूनला ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात जाण्यास निघाले होते. ऐरोलीतील दिवागाव सर्कल जवळ येईपर्यंत पावसाचा जोर वाढला होता. तिथे एका ज्येष्ठ नागरिकासह अन्य दोन युवक पावसापासून स्वत:चा बचाव करत उभे होते. नितीन यांनी त्यांना लिफ्ट दिली. त्याच वेळी एका वाहतूक पोलिसाने नायर यांना अडवून अशा प्रकारे बस थांब्यावरून प्रवाशांना घेऊन जाणे कायद्याने गुन्हा आहे असे सांगत त्यांचा वाहन परवाना जप्त केला व पावतीही दिली. पावती न्यायालयात दाखवून दंड भरून वाहन परवाना घ्या, असे सांगितले.

नितीन हे न्यायालयात गेले असता दंडाची रक्कम दोन हजार रुपये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही रक्कम कमी करण्याची विनंती २२ जून रोजी न्यायालयाला केली. तेव्हा त्यांचा दंड दीड हजार रुपयांवर आणण्यात आला. तो भरल्यावर तरी आपला वाहन परवाना मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, मात्र वाहन परवाना सीबीडी पोलीस ठाण्यात मिळेल असे सांगितले गेले. दिवसभर न्यायालयात थांबल्यावर ते पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. त्याही ठिकाणी साहेब बाहेर गेले आहेत, मीटिंग सुरू आहे, थांबावे लागेल, असे सांगून त्यांना थांबवण्यात आले. शेवटी संध्याकाळी त्यांना वाहन परवाना परत मिळाला.

लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने वाहनचालकाला लुटण्याचे अनेक प्रकार झाले आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणारेही लिफ्ट दिली वा नातेवाईक आहेत अशा थापा मारतात. ज्या ठिकाणी नायर यांना वाहतूक नियमांचा बडगा दाखवण्यात आला त्याच ठिकाणी ठाणे, मुलुंड व अंधेरीसाठी बिनदिक्कत अवैध प्रवासी वाहतूक केली जाते.

माझ्याकडून कायद्याचे उल्लंघन अजाणतेपणी  झाले, मात्र कायदा मोडण्याचा माझा हेतू नव्हता. हे लक्षात घेणे गरजेचे होते, असे वाटते. लिफ्ट देणे किती महागात पडू शकते हे लोकांना कळावे, यासाठी हा अनुभव समाजमाध्यमावर सांगितला.     – नितीन नायर, वाहनचालक

वाहनचालकाने न्यायालयात चूक मान्य करून दंडाची रक्कम भरली आहे. वाहतूक कर्मचाऱ्याने कारवाई करताना त्यामागचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात आल्या असून, सदर कर्मचाऱ्याची बदली प्रशासन विभागात करण्यात आली आहे. वाशी वाहतूक विभाग त्याची  चौकशी करणार आहे.   – नितीन पवार, उपायुक्त वाहतूक शाखा